‘अग्निपथ’ प्रकरण : सोशल मीडिया पोलिसांच्या रडारवर | पुढारी

‘अग्निपथ’ प्रकरण : सोशल मीडिया पोलिसांच्या रडारवर

सातारा : पुढारी वृत्तसेवा
‘अग्‍निपथ’ या केंद्र शासनाच्या योजनेवरुन काही राज्यात उद्रेक निर्माण झाल्याने सातारा जिल्ह्यातील सोशल मीडिया पोलिसांच्या रडारवर आला आहे. कायदा व सुव्यवस्था निर्माण होतील असे मेसेज फॉरवर्ड करु नयेत. अन्यथा संबंधित व्यक्‍ती व ग्रुप अ‍ॅडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन एसपी अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.

‘अग्‍निपथ’ प्रकरणावरुन काही राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही राज्यांमध्ये रेल्वे, बस यासह सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातही त्याबाबत 20 रोजी मिटींग होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. यामुळे सातारा पोलिस अलर्ट झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिक, सैन्य दलात भरतीची तयारी करणार्‍या, करिअर अ‍ॅकॅडमीचे मालक यांनी अशा मेसेजवर विश्‍वास ठेवू नये. तसेच असा मेसेज फॉरवर्ड करु नये, असे म्हटले आहे. लोकांमध्ये भावना भडकावून हिंसाचाराच्या घटना घडतील असे आढळून आल्यास. तसेच हिंसाचार घडेल असे मजकूर व्हायरल झाल्यास संबंधित व्यक्‍ती, अ‍ॅडमिन यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले जातील. यामुळे संबंधित युवकांचे भवितव्य अडचणीत येईल व नोकरी मिळणार नाही. यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर यासह विविध सोशल माध्यमे सातारा पोलिसांच्या निगराणीखाली आहेत. यातूनही आक्षेपार्ह मेसेज बाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. याबाबत संबंधितांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Back to top button