Agnipath Portest : अग्निपथ योजनेविरोधात भारत बंद; ५३९ रेल्वे रद्द | पुढारी

Agnipath Portest : अग्निपथ योजनेविरोधात भारत बंद; ५३९ रेल्वे रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या  Agnipath Portest विरोधात आज अनेक संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.  बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये तरुणांमधून रोष व्यक्त हाेत आहे. या निदर्शनांमुळे बिहारमधील सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने आज (दि.२०) बिहारमध्ये सुमारे ३५० गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत बंदमुळे १८१ मेल एक्सप्रेस आणि ३४८ पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी,४ मेल एक्सप्रेस आणि ६ पॅसेंजर गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रद्द झालेल्या एकूण गाड्यांची संख्या ५३९ वर पोहोचली आहे.

२० जिल्ह्यांतील इंटरनेट सेवाही बंद

Agnipath Portest त्याचबरोबर आज २० जिल्ह्यांतील इंटरनेट सेवाही बंद राहणार आहे. दरम्यान, या योजनेला विरोध होत असतानाच आता अनेक संघटनांनी आज भारत बंदची घोषणा केली आहे. भारत बंदच्या घोषणेनंतर राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्गावर भारत बंदमुळे मोठ्या प्रमाणात रस्ता जाम झाला होता. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

जेहानाबादमध्ये ड्रोन रुममधून उपद्रवी आणि समाजकंटकांवर नजर ठेवली जात आहे. समाजकंटकांकडून सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ४३ जणांना अटक करण्यात आली आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा सज्ज ठेवला आहे. रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या जीआरपी पोलिसांनी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.

समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाकडून ड्रोन कॅमेऱ्यांतून नजर ठेवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, जेहानाबादमध्येच बंद दिसून येत आहे. रस्त्यावर तुरळक वाहने दिसत आहेत. रस्त्यावर कुठेही आंदोलनकर्ते किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते दिसत नाहीत. दुसरीकडे, रेल्वे स्थानकासह संपूर्ण शहर पोलीस छावणीत रूपांतरित झाले असून, डीएम, एसपींसह वाहनांसह रस्त्यावर गस्त घालत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button