‘अग्‍निपथ’ला विरोध सुरुच, बिहारमध्‍ये रेल्‍वे सेवा ठप्‍प | पुढारी

'अग्‍निपथ'ला विरोध सुरुच, बिहारमध्‍ये रेल्‍वे सेवा ठप्‍प

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
केंद्र सरकारच्‍या लष्‍करात भरतीसाठीच्‍या अग्‍निपथ भरती योजनेस बिहारमध्‍ये विरोध सुरुच आहे. यामुळे राज्‍यात रेल्‍वे सेवा बंद करण्‍यात आली आहे. रविवारी ( दि. १९ ) पहाटे चार ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्व रेल्‍वे गाड्या रद्‍द करण्‍यात आल्‍या आहेत. राज्‍यातील रेल्‍वे सेवा पूर्णत: विस्‍कळीत झाली आहे.

बिहारमध्‍ये सर्वाधिक हिंसाचार झाला आहे. राज्‍यात रेल्‍वेचे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज आंदोलकांनी बिहार बंदची हाक दिली होती. राज्‍यात एका पोलिस ठाण्‍यासह पोलिस वाहनाला जमावाने आग लावली. दगडफेकेत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले.

‘अग्‍निपथ’ला विरोध सुरुच :  देशभरात ३५० पेक्षाही अधिक ट्रेन रद्द

अग्‍निपथ भरती योजनेला देशातील विविध राज्‍यांमधये तीव्र विरोध होत आहे. देशभरात ३५० हून अधिक ट्रेन रद्द करण्‍यात आला. पूर्व मध्‍य रेल्‍वेने हिंसाचाराच्‍या घटनामुळे काही ट्रेन रद्द केल्‍या आहेत. तर काहींच्‍या वेळापत्रकांमध्‍ये बदल केला आहे. दरम्‍यान, हिंसाचारप्रकरणी बिहार, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्‍ये शेकडो तरुणांना अटक करण्‍यात आली आहे.

अग्‍निवीरांना लष्‍करातही १० टक्‍के आरक्षण

केंद्र सरकारची महत्त्‍वाकांक्षी योजना अग्‍निपथ लष्‍कर भरती योजनेला देशातील विविध राज्‍यांमध्‍ये तीव्र विरोध कायम आहे. . यामुळे आता या योजनेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तिन्‍ही सैन्‍य दल प्रमुखांची बैठक झाली. आता यापुढे लष्‍कराच्‍या अंतर्गत येणार्‍या विविध विभागांमध्‍ये अग्‍निवीरांना १० टक्‍के आरक्षण देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे की, आता अग्‍निपथ योजनेंतर्गत जवानांना चार वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. अग्‍निवीरांना लष्‍करासह विविध विभागांमध्‍ये १० टक्‍के आरक्षण दिले जाईल. तसेच त्‍यांना कोस्‍ट गार्ड, संरक्षण दलाच्‍या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या १६ कंपन्‍यांमध्‍ये आरक्षण दिले जाणार आहे. या नव्‍या नियमांना केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाल्‍यानंतर याबाबत अधिकसूचना काढली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय गृह मंत्रालयानेही केली होती १० टक्‍के आरक्षणाची घोषणा

केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्‍निवीरांना केंद्रीय राखीव पोलीस दल ( सीआरपीएफ) आणि आसाम रायफर्लंसमधील भरतीत १० टक्‍के आरक्षणाचा देण्‍यात येईल, असे स्‍पष्‍ट केले होते. तसेच वयोमर्यादेत ३ ते ५ वर्षांची सवलत देण्‍यात येणार असल्‍याचे जाहीर केले होते.

हेही वाचा :

Back to top button