Agneepath Scheme Protest : अकरा राज्यांत ‘अग्‍निपथ’चा भडका | पुढारी

Agneepath Scheme Protest : अकरा राज्यांत ‘अग्‍निपथ’चा भडका

लखनौ / पाटणा; वृत्तसंस्था : लष्कर भरतीसाठी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या अग्‍निपथ योजनेच्या विरोधात (Agneepath Scheme Protest) शुक्रवारीही हिंसाचार सुरूच राहिला. उत्तर प्रदेश, बिहार आणि तेलंगणात युवकांच्या जमावाने रेल्वेगाड्या पेटविल्या. अनेक ठिकाणी रेल्वे रोको, रास्ता रोको करण्यात आले. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान न करण्याचे आवाहन आंदोलकांना केले.

हरियाणातील नारनौलमध्ये युवकांनी रास्ता रोको केला (Agneepath Scheme Protest). फिरोझाबादेत आगरा-लखनौ एक्स्प्रेस वे वर रास्ता रोको करणार्‍या युवकांनी चार बसची तोडफोड केली. तेलंगणातील हिंसाचारात एक जण ठार झाला; तर बिहारमधील लखिसराय येथेही एकाचा मृत्यू झाला. हरियाणातीलच पलवल येथे युवकांनी पोेलिसांवर गावठी पिस्तुलांनी, लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. याप्रकरणी 142 युवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे व धरपकड सुरू केली आहे. राजस्थानातील भरतपूर रेल्वे स्थानकावर निदर्शकांनी एका पोलिसाला रक्‍तबंबाळ केले. आंदोलनामुळे देशभरात रेल्वेसेवा विस्कळीत झाली; तर 316 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. उत्तर प्रदेशातील बलियामध्ये पहाटे 5 वाजताच निदर्शने सुरू झाली. अनेक वाहनांच्या काचा निदर्शकांनी फोडल्या. पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले आहे. बिहारमधील दानापूर रेल्वे स्थानकावर हिंसक निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.

बिहारमध्ये 10 रेल्वेगाड्या जाळल्या; उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर दगडफेक (Agneepath Scheme Protest)

बिहारमधील 25 जिल्ह्यांत निदर्शने झाली. 10 रेल्वे गाड्या पेटवून देण्यात आल्या. समस्तीपुरात, लखिसरायमध्ये, तर आरा आणि सुपौल येथे रेल्वेगाड्या निदर्शकांनी पेटवून दिल्या. बक्सर, नालंदासह अनेक जिल्ह्यांत रेल्वे रुळांचे नुकसान केले. बेतिया येथे उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या शासकीय निवासस्थानावर दगडफेक करण्यात आली. वैशालीतील हाजीपूर रेल्वेस्थानकावर मोडतोड झाली. समस्तीपुरात जम्मू तावी-गुवाहाटी एक्स्प्रेस, बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना आग लावण्यात आली.

रास्ता रोकोत शालेय बस अन् मुलांची रडारड (Agneepath Scheme Protest)

बिहारमधीलच दरभंगा येथे निदर्शकांनी केलेल्या रास्ता रोकोमध्ये एक शालेय बस अडकली. निदर्शकांच्या हातांतील लाठ्या-काठ्या पाहून बसमधील मुले रडू लागली. अखेर पोलिसांनी ही बस सुरक्षितपणे निदर्शकांच्या गदारोळातून बाहेर काढली.

मध्य प्रदेशातील इंदूर, ग्वाल्हेरसह ठिकठिकाणी निदर्शने झाली. पुणे-इंदूर रेल्वे निदर्शकांनी रोखली. झारखंडच्या पोलामू जिल्ह्यातील डाल्टनगंज रेल्वे स्थानकावर निदर्शकांनी 45 मिनिटे गोंधळ घातला.

तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर मोडतोड झाली. उभ्या रेल्वेला निदर्शकांनी आग लावून दिली. खिडक्यांची मोडतोड केली. दिल्ली, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल येथेही निदर्शने झाली.

40 प्रवाशांना वाचविले

तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर निदर्शकांनी एका रेल्वेगाडीला आग लावली. आग लावण्यात आलेल्या डब्यातील 40 प्रवाशांना रेल्वे कर्मचार्‍यांनी त्वरित बाहेर काढून सर्वांचा जीव वाचविला. येथील हिंसक निदर्शनांत एक जण मरण पावला आहे.

नोटबंदी, जीएसटी, कृषी कायद्यांनंतर अग्‍निवीर भरती योजनाही जनतेने नाकारलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील लोकभावनाच कळत नाहीत.
– राहुल गांधी, काँग्रेस नेते

योजना जाहीर केल्यानंतर 24 तासांतच वयोमर्यादेबाबतचा नियम बदलण्याची वेळ केंद्र सरकारवर ओढवली. घाईगडबडीत सरकार ही योजना युवकांवर लादत आहे. अग्‍निपथ योजना सरकारने तत्काळ मागे घ्यावी.
– प्रियांका गांधी-वधेरा, काँग्रेस

अग्‍निपथ योजनेत वयोमर्यादा 21 ऐवजी 23 वर्षे करण्यात आली आहे. वयोमर्यादा उलटलेल्या युवकांसाठी ही बाब लाभदायक आहे. कोरोनानंतर युवकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

अग्‍निपथ योजनेला युवकांचा विरोध का?

अग्‍निपथ योजनेत चमकदार कामगिरी करणार्‍या 25 टक्के युवकांना लष्कराच्या सेवेत नियमित (कायम) केले जाईल; तर उर्वरित युवकांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल. याच प्रमुख तरतुदीमुळे युवकांकडून अग्‍निपथ योजनेला तीव्र विरोध होत आहे.

सैन्यभरतीच्या तयारीतील युवकाची आत्महत्या

भुवनेश्‍वर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील तेंतेई गावात सैन्य भरतीची तयारी करणार्‍या धनंजय मोहंती नावाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. ‘अग्‍निपथ’ योजनेमुळे भारतीय सैन्य भरतीची लेखी परीक्षा रद्द झाली. त्यामुळे आलेल्या नैराश्यात आमच्या मुलाने आत्महत्या केली, असा आरोप धनंजयच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Back to top button