नोकरीसाठी सादर केले दहावीचे बनावट प्रमाणपत्र; तरुणावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा | पुढारी

नोकरीसाठी सादर केले दहावीचे बनावट प्रमाणपत्र; तरुणावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भारतीय टपाल (पोस्ट) खात्यातील ग्रामीण डाकसेवक या पदाची नोकरी मिळविण्यासाठी दहावीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी वैजनाथ मल्लिकार्जुन कुंभार (वय 25, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टपाल खात्यातील अधिकारी योगेश नानासाहेब वीर (वय 41, रा. घोरपडी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. कुंभारने बनावट प्रमाणपत्र सादर करून नियुक्तिपत्र मिळवले होते. त्यानंतर त्याने मार्केट यार्ड गुलटेकडी येथील टपाल कार्यालयात दीड महिने नोकरीदेखील केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार भारतीय टपाल खात्यातील पुणे शहर पूर्व विभागातील मार्केट यार्ड टपाल कार्यालयात ग्रामीण डाकसेवक पदावर नोकरीला होता.

त्यासाठी त्याने पात्रतेच्या निकषानुसार कागदपत्रे सादर केली होती. ही सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी मुख्य कार्यालयात पाठविण्यात आली होती. त्यावेळी त्यातील दहावी बोर्डाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. येथील कार्यालयातील अधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. संबंधित अर्जाची चौकशी केल्यानंतर फसवणूक करत नोकरी मिळवल्याप्रकरणी पोलिसांनी कुंभारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

हेही वाचा

पिंपरी : किरकोळ कारणावरून दोन मुलांवर चाकूने वार

पुणे: सहायक पोलिस निरीक्षकास लाच घेताना पकडले; रांजणगाव पोलिस ठाण्यातील घटना

एकच दिवस बरसला मान्सूनपूर्व पाऊस; हवेचा दाब जास्त, वार्‍याचा वेग कमी

Back to top button