दिल्लीतील जामा मशिदीबाहेरील आंदोलनप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

दिल्लीतील जामा मशिदीबाहेरील आंदोलनप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करीत दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी नमाज पठणानंतर आंदोलन करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी यासंबंधी आता अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आंदोलन करणाऱ्याविरोधात आयपीसीचे कलम १८८ (महारोगराई कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली. आंदोलकांची ओळख पटवण्याच्या अनुषंगाने आता पोलीस तपास करीत आहे. आंदोलन कुणी केले यासंबंधी कुणालाच माहिती नाही, अशी प्रतिक्रिया जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी व्यक्त करीत आंदोलकांवर कारवाईची मागणी केली होती.

मशिदीच्या गेट क्रमांक १ जवळ शांततेत आंदोलन झाले. जवळपास १५ ते २० मिनिटांनी आंदोलक निषेध नोंदवून निघून गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मशिदमध्ये जवळपास दीड हजार मुस्लिम बांधव एकत्रित झाले होते. नमाज पठणानंतर काही लोकांनी बाहेर येवून हातात निषेधाचे फलक घेवून घोषणाबाजी सुरू केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिली. पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करीत असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button