‘धरोहर’चा आजपासून प्रारंभ, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

‘धरोहर’चा आजपासून प्रारंभ, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन

पणजी : पुढारी वृत्तसेवा तस्करी कशी होते? देशातील कर आकारणीचा इतिहास काय? हे जाणून घेण्यासाठी आता नूतनीकरण केलेल्या कस्टम्स आणि वस्तू सेवा कर (जीएसटी) संग्रहालयाला लोकांना एकवेळ तरी भेट द्यावी लागणार आहे. ‘धरोहर’ या सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाच्या नवीन आणि नूतनीकरण केलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन शनिवारी होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते पणजी शहरात असलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.

गोवा जीएसटी कौन्सिलचे प्रतिनिधी आणि मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, निश्‍चितच हे संग्रहलायात तस्करी केलेल्या वस्तू, तस्करांची कहाणी आणि सीमाशुल्क इतिहासाची झलक पाहायला मिळणार आहे. याशिवाय, अप्रत्यक्ष करांच्या इतिहासाची माहितीदेखील त्यांना मिळेल. देशातील सर्वात ऐतिहासिक अप्रत्यक्ष कर सुधारणा, वस्तू आणि सेवा कर निर्मितीचा प्रवास दर्शविणारी जीएसटी गॅलरी अलीकडेच या संग्रहालयात समाविष्ट करण्यात आली आहे.

देशातील हे पहिले संग्रहालय गोव्यात असून, केंद्र सरकारने गोव्यासाठी ही भेट दिली आहे. त्यामुळे पर्यटकांनाही त्याचे आकर्षण राहील, असे त्यांनी सांगितले. या संग्रहालयात तिकीट आकारणी असली तरी पहिले तीन महिने ते मोफत पाहायला मिळणार आहे.
अकबरीची हस्तलिखिते, अमीन खांबांची प्रतिकृती, जप्त केलेल्या धातूच्या आणि दगडी कलाकृती, हस्तिदंती व वन्यजीव वस्तू ही या प्रदर्शनातील प्रमुख लक्षणीय आकर्षणे असतील, असे ते म्हणाले.

संग्रहालयाची वैशिष्ट्ये

  1. राजधानीतील प्रसिद्ध निळ्या इमारतीमध्ये हे धरोहर संग्रहालय आहे.
  2. पोर्तुगीज राजवटीत पूर्वी ‘अल्फांडेगा’ या नावाने ओळखली जाते.
  3. 400 वर्षांहून अधिक काळ ही इमारत या ठिकाणी उभी आहे.
  4. धरोहर हे देशातील अशा प्रकारचे एकमेव संग्रहालय आहे.
  5. भारतीय सीमाशुल्क विभागाद्वारे देशभरातून जप्त केलेल्या कलाकृती या संग्रहालयात आहेत.
  6. सीमाशुल्क प्रक्रिया नेमकी काय आहे, याची माहिती सामान्य लोकांना व्हावी, यासाठी येथे सोय केलेली आहे.

Back to top button