Supreme Court : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांसंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल करा, सुप्रीम कोर्टाचे मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाला निर्देश | पुढारी

Supreme Court : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांसंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल करा, सुप्रीम कोर्टाचे मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाला निर्देश

नवी दिल्ली, : पुढारी वृत्तसेवा

नीट पीजी-२०२१ च्या ऑल इंडिया कोट्यातील तब्बल १ हजार ४५६ जागा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

या जागांवर पुन्हा एकदा काउंसलिंग घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी घेत रिक्त जागांसंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाला दिले आहेत.जागा का रिक्त आहेत? का भरण्यात आल्या नाहीत ? याचे उत्तर प्रतिज्ञापत्रातून द्यावे लागेल. न्यायमूर्ती एम.आर.शाह तसेच न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांचे खंडपीठ यासंबंधी सुनावणी घेत आहे.उद्या,गुरूवारी पुन्हा याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल.

जागा रिक्त ठेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करता येणार नाही,अशा शब्दात न्यायालयाने मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया तसेच केंद्र सरकारची कानउघाडणी केली.तुम्हाला ‘मॉप अप राउंड’ घ्यायला हवा होता.मे महिन्यातच जागा रिक्त असल्याची माहिती मिळाल्यानंतर देखील मॉप अप राउंड का घेण्यात आला नाही? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. डॉक्टर, सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांची आवश्यकता असतांना जागा रिक्त ठेवून काय मिळेल? असा सवाल विचारत यासंबंधी आरोग्य सेवा महासंचालकांना हजर होण्याचे निर्देश देत आदेश पारित करु, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

देशात डॉक्टर,सुपरस्पेशिलिटी मेडिकल प्रोफेशनल्सची आवश्यकता असताना देखील मॉप अप राउंड न घेतल्याने मेडिकल काउंसिल तसेच केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळत आहे.जर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही, तर आदेश पारित करु असे ठणकावून सांगत विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

Back to top button