नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
काश्मिरमधील हिंदू लोकांच्या 'टारगेटेड किलिंग' विरोधात आम आदमी पक्षाने रविवारी जंतर मंतरवर निदर्शने केली. आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया, खा. संजय सिंग व इतर नेत्यांनी सहभाग घेतला.
केजरीवाल यांच्यासह इतर नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर एकच हल्लाबोल केला. काश्मीरी पंडितांवर जेव्हा जेव्हा हल्ले होतात तेव्हा बैठका घेण्याशिवाय भाजप काहीच करत नाही, असे सांगून केजरीवाल म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात नव्वदच्या दशकातली परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी देशातले लोक काश्मीरच्या अनुषंगाने चिंतीत होते आणि आजही ते चिंतेत पडले आहेत. काश्मीरमधून जेव्हाही हिंदूच्या हत्येची बातमी येते तेव्हा दुसरी बातमी गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावल्याची येते. अशा किती बैठका आता बोलवाल, खरे तर कृती करण्याची वेळ आली आहे. खूप झाल्या तुमच्या बैठका, ऍक्शन प्लॅन काय आहे ते लोकांना जाणायचे आहे.केजरीवाल यांनी याप्रसंगी पाकिस्तानवरही जोरदार टीका केली.
खा. संजय सिंग म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात हिंदू लोकांना ठार मारले जात आहे. जवळपास दररोज हिंदूंच्या हत्या होत आहेत. 'काश्मीर फाईल्स' चित्रपटावरून जे लोक मगरीचे अश्रू ढाळत होते, ते आता मात्र शांत आहेत. भाजपचे सगळे खासदार, आमदार, मंत्री आणि पंतप्रधान 'काश्मीर फाइल्स' चित्रपट बघा म्हणून लोकांना सांगत होते. आता काश्मीरमध्ये हिंदूंचे हत्यासत्र सुरु असताना हे सगळे कोठे गेले आहेत? पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत आल्यावर नवीन काश्मीर बनेल, असे सांगितले होते. नवीन काश्मीर तर बनला नाहीच. पण या सरकारने नव्वदच्या दशकातला काश्मीर तयार केला आहे. विद्यमान परिस्थिती पाहता हे भाजपचे नव्हे तर राष्ट्रीय शरमेचे सरकार असल्याचे म्हणावे लागेल. भाजप सरकारला काश्मीरची नाही तर दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकण्याची चिंता आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा :