'aap' government : पंजाबमध्ये 'आप' सरकार सुसाट; ४२४ व्हीआयपींची सुरक्षा हटवली | पुढारी

'aap' government : पंजाबमध्ये 'आप' सरकार सुसाट; ४२४ व्हीआयपींची सुरक्षा हटवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने (‘aap’ government) धडाडेबाज निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. ज्या व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, त्यात अनेक निवृत्त अधिकारी आणि माजी आमदारांचा समावेश आहे. सुरक्षा काढून घेण्यापूर्वी पंजाब सरकारने या मुद्द्यावर आढावा बैठक घेतली होती, ज्यामध्ये ४२४ लोकांना सुरक्षेची गरज आहे का ? यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

४२४ व्हीआयपींची राज्य सरकारने  (‘aap’ government) सुरक्षा कमी करण्याचे आदेश जारी केले आहेत. सुरक्षा काढून घेण्यामागचे एक कारण म्हणजे पंजाब पोलिसांमध्ये आधीच कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचेही सांगितले जात आहे. अशा स्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामान्य ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढणे कठीण होत आहे. त्यामुळे व्हीआयपींच्या सुरक्षेत अडकून राहणारे पोलीस कर्मचारी आता राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी येणार आहेत.

याआधी एप्रिलमध्ये पंजाब सरकारने माजी मंत्री, माजी आमदार आणि इतर नेत्यांसह १८४ लोकांची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग आणि काँग्रेस आमदार प्रताप सिंग बजवारे यांच्या पत्नी यांच्या कुटुंबाची सुरक्षा गेल्या महिन्यात काढून घेण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतीच भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान यांनी राज्याचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांच्याविरुद्ध आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची गंभीर देखल घेत त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी केली आहे. कंत्राटासाठी ते अधिकाऱ्यांकडून १ टक्के कमिशनची मागणी करत होते. सिंगला यांच्याविरुद्ध ठोस पुरावे सापडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, विजय सिंगला यांना मंत्रिपदावरुन हटवल्यानंतर भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना पंजाबच्या लाचलुचपत विभागाने अटक केली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button