Road accident : महाराष्ट्रासह प्रमुख राज्यांमधील रस्ते अपघात लक्षणीय घट | पुढारी

Road accident : महाराष्ट्रासह प्रमुख राज्यांमधील रस्ते अपघात लक्षणीय घट

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : रस्ते अपघाताच्या (Road accident)प्रमाणात २०२० मध्ये महाराष्ट्रासह केरळ, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख राज्यांमध्ये लक्षणीय घट दिसून आली आहे. तर, तमिळनाडू, गुजरात, राज्यस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यांनी रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट साध्य केली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखाने (टीआरडब्ल्यू ) तयार केलेल्या ‘भारतातील रस्ते अपघात-२०२०’ या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे.

२०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रस्ते अपघातात (Road accident)सरासरी १८.४६ टक्क्यांनी, तर अपघातातील मृत्यूसंख्येत १२.८४ टक्क्यांनी घट झाल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे. रस्ते अपघातात जमखी होणाऱ्यांचे प्रमाण यावर्षी २२.८४ टक्क्यांनी कमी झाले. यावर्षी राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेल्या ३ लाख ६६ हजार १३८ अपघातात १ लाख ३१ हजार ७१४ लोकांचा मृत्यू तर, ३ लाख ४८ हजार २७९ लोक जखमी झाले.

रस्ते अपघाताच्या प्रमाणात २०१८ मध्ये झालेली ०.४६ टक्क्यांची किरकोळ वाढ वगळता २०१६ पासून अपघातांचा आलेख मंदावला आहे. अहवालानुसार, प्राणघातक अपघातांच्या संख्येतही घट झाली आहे. २०२० मध्ये एकूण १,२०,८०६ प्राणघातक अपघातांची नोंद झाली, ही संख्या १, ३७, ६८९ च्या २०१९ च्या आकडेवारीपेक्षा १२.२३ टक्के कमी आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि इतर रस्त्यांवर आधीच्या वर्षाच्या तुलनेत कमी अपघातांची, मृत्यूंची आणि जखमींची नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button