अभिमानास्पद! कॅप्टन अभिलाषा बराक बनल्या लष्कराच्या पहिल्या महिला फायटर पायलट | पुढारी

अभिमानास्पद! कॅप्टन अभिलाषा बराक बनल्या लष्कराच्या पहिल्या महिला फायटर पायलट

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅप्टन अभिलाषा बराक (captain abhilasha barak) बुधवारी लष्कराच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. यानंतर त्या लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्समध्ये सामील झाल्या आणि हा दिवस लष्कराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. लष्कराने ट्विट करून ही माहिती दिली. लष्कराने जारी केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की, “भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सच्या इतिहासातील सुवर्ण दिवस. कॅप्टन अभिलाषा बराक यशस्वी प्रशिक्षणानंतर फायटर पायलट म्हणून आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये सामील होणारी पहिली महिला अधिकारी ठरली.’

नाशिकच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या निरोप समारंभात आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते कॅप्टन अभिलाषा यांच्यासह 36 वैमानिकांना बोधचिन्ह ‘विंग्ज’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हे तरुण पायलट आता फायटर स्क्वॉड्रनमध्ये तैनात केले जातील, अशी माहिती लष्कराने दिली. (captain abhilasha barak)

कॅप्टन अभिलाषा (captain abhilasha barak) मूळच्या हरियाणाच्या आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये त्यांची आर्मी एव्हिएशन डिफेन्स कॉर्प्समध्ये नियुक्त करण्यात आली. त्यांचे वडील कर्नल ओम सिंग (निवृत्त) हे 8-जम्मू-काश्मीर लाईट इन्फंट्रीमध्ये होते.

भारताने संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीन वर्षांनंतर कॅप्टन अभिलाषा बराक बुधवारी लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ पायलट बनल्या. लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्समध्ये रुजू झाल्यामुळे हा दिवस लष्करासाठी ऐतिहासिक ठरला. आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये रुजू होण्यापूर्वी अभिलाषा नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला. एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बुधवारी त्यांना महिला फायटर पायलट म्हणून सैन्यात सामील करण्यात आले.

लष्कराच्या म्हणण्यानुसार, 15 महिला अधिकाऱ्यांनी आर्मी एव्हिएशनमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा दोन महिला अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टर पायलट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. दोघींना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. सध्या विमान वाहतूक विभागात महिलांना एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) आणि ग्राउंड ड्युटी (DG) ही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता यापुढे महिला अधिकारी पायलटची जबाबदारी पार पाडणार आहेत.

2018 मध्ये एअर फोर्स फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी या फायटर प्लेन उडवणा-या पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.

आर्मी एव्हिएशन कॉर्प्सची स्थापना 1 नोव्हेंबर 1986 ला करण्यात आली. कॉर्प्सच्या उमेदवारांना नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CATS) येथे प्रशिक्षण दिले जाते. याचे नेतृत्व नवी दिल्लीतील महासंचालक दर्जाचे लेफ्टनंट जनरल करतात. युद्धभूमीवर सहकार्य, लष्करी सर्वेक्षण या प्रमुख भूमिकांमध्ये हे कॉर्प काम करते. एव्हिएशन कॉर्प्सकडे चेतक, रुद्र आणि ध्रुव सारखी उत्कृष्ट हेलिकॉप्टर्स आहेत, ज्याद्वारे हे कॉर्प आपले ध्येय पार पाडते.

Back to top button