पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रेल्वेने २१ जूनपासून १८ दिवसांच्या 'श्री रामायण यात्रा' (Sri Ramayana Yatra) या धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत श्री राम दर्शनासह धार्मिक तीर्थक्षेत्रांचे दर्शन करता येणार आहे. रेल्वेने या पहिल्याच भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचे आयोजन केले आहे. या सहलीचे बुकिंग इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) येथून करता येणार आहे.
आतापर्यंत श्री रामायण यात्रा सहलीसाठी (Sri Ramayana Yatra) २८५ लोकांनी बुकिंग केले आहे. यामध्ये सर्वाधिक बुकिंग महाराष्ट्रातून ६१ लोकांनी केले आहे. तर उत्तर प्रदेशातून ५५ लोकांनी बुकिंग केले आहे. ५ टक्के डिस्काउंट पहिल्या ५० लोकांना देण्यात येणार असल्याचे आयआरसीटीसीने सांगितले. प्रवाशांना हफ्त्यांच्या माध्यमातून तिकिट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही संपर्ण यात्रा ८ हजार किलोमीटरची आहे. दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्टेशन येथून २१ जूनला या यात्रेची सुरूवात होणार आहे. १८ दिवसांच्या यात्रेत सुमारे ६०० प्रवाशांना वातानुकुलित डब्यातून प्रवास करता येणार आहे. रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी सुरक्षा रक्षक तैनात असतील. आयआरसीटीसीच्या कार्यालयीन वेबसाईटवर प्रवाशांना बुकिंग करता येणार आहे. या यात्रेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ६२ हजार ३७० रूपये भरावे लागणार आहेत.
या सहलीचा ८ हजार किलोमीटर प्रवास असून नेपाळसह भारतील ८ राज्यातून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यात ही सहल जाणार आहे.
उत्तर प्रदेशातील अयोध्यामधील राम जन्मभूमी मंदिर, हनुमान गढी, भरत हनुमान मंदिर, भरत कुंड, शरयू घाट पाहता येणार आहे. नेपाळमधील जनकपूरमधील राम जानकी मंदिराचे दर्शन करता येणार आहे. त्यानंतर बिहारमधील सीतामढी येथील जानकी मंदिर आणि पुरातन धामचे दर्शन करता येणार आहे. बक्सरमधील राम रेखा घाट, रामेश्वर नाथ मंदिर, वाराणसीतील संकटमोचन मंदिर, तुलसी मानस मंदिर, भारद्वाज आश्रम, हनुमान मंदिर, विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सायंकाळी गंगा आरती दाखवली जाणार आहे.
प्रयागराज सीतामढी, भारद्वाज आश्रम, गंगा- यमुना संगम आणि हनुमान मंदिराचे दर्शन केले जाणार आहे. त्यानंतर श्रृंगवेरपूरमधील रामचौरा, श्रिंगी ऋषी आश्रम आणि राम घाट येथे ही सहल जाईल. त्यानंतर ही रेल्वे चित्रकुटमध्ये जाईल. तेथे सती अनुसया मंदिर, गुप्त गोदावरी आणि रामघाटचे दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर ही सहल तमिळनाडूतील रामेश्वरमधील रामनाथस्वामी मंदिर आणि धनुषकोडी येथे जाईल. कांचीपूरम विष्णु कांची, शिवा कांची आणि कामाक्षी अम्मान मंदिर येथे दर्शन केले जाणार आहे.
हेही वाचलंत का ?