sugar exports : ब्रेकिंग : गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध? | पुढारी

sugar exports : ब्रेकिंग : गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
गव्हानंतर केंद्र सरकार आता साखरेच्या निर्यातीवरही ( sugar exports ) निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. देशांतर्गत साखरेचे वाढत चालेल्या दरांवर निर्बंध घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेणार आहे. जवळपास १ कोटी टन इतक्या साखरेची निर्यात रोखली जाणार आहे.

sugar exports : सहा वर्षांनंतर प्रथमच साखरेची निर्यात रोखली जाणार

सरकारने निर्णय घेतला तर सहा वर्षांनंतर प्रथमच साखरेची निर्यात रोखली जाणार आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देशांपैकी एक आहे, तर ब्राझिलनंतर क्रमांक दोनचा साखर निर्यातदार देश आहे. निर्यात बंदीच्‍या वृत्तानंतर साखरेशी संबंधित उद्योगांचे शेअर बाजारातील दरही कोसळले आहेत.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातील अन्नपदार्थांच्या किंमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे जगभरातील विविध देशांतील सरकार महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच मलेशियाने १ जूनपासून चिकनची निर्यात थांबवली आहे. तसेच मलेशियानेच पाम तेलाची निर्यातही तात्पुरती थांबवली आहे. सर्बिया, कझाकिस्तान यांनीही धान्यांच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहे.
भारतात उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाल्यानंतर सरकारने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लादण्‍याच्‍या विचारात आहे.

मे महिन्यात निर्यातीमध्ये भरीव वाढ

चालू मे महिन्यातील 1 ते 21 तारखेदरम्यान निर्यातीमध्ये 21.1 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती व्यापार मंत्रालयाकडून मंगळवारी देण्यात आली. सदर कालावधीत 23.7 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. पेट्रोलियम पदार्थ, अभियांत्रिकी तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत भरीव वाढ झाली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निर्यात 24 टक्क्याने वाढून 8.03 अब्ज डॉलर्सवर गेली. 1 ते 21 मे या कालावधीत पेट्रोलियम पदार्थ, अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत क्रमशः 81, 17 व 44 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. संपूर्ण मे महिन्यातील निर्यातीचे आकडे जून महिन्यात दिले जातील, असेही व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. गत एप्रिल महिन्यात निर्यातीत 30.7 टक्क्यांची भरीव वाढ झाली होती. त्यावेळी निर्यात 40.19 अब्ज डॉलर्सवर गेली होती तर आयात 30.97 टक्क्यांनी वाढून 60.3 अब्ज डॉलर्सवर गेली होती.

हेही वाचा : 

 

 

Back to top button