Devendra Fadnavis : ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारा : देवेंद्र फडणवीस | पुढारी

Devendra Fadnavis : ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारा : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंधन दरवाढ, ओबीसी आरक्षण, राज्य सरकारची धोरणे यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (दि.२४) मुंबईत झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीत हल्लाबोल केला. याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

फडणवीस  (Devendra Fadnavis) म्हणाले की, इंधनावर केंद्रापेक्षा राज्याचा दर अधिक आहे. पेट्रोल, डिझेलवर राज्याचा टॅक्स २९ रूपये आहे. तर केंद्राचा १९ रूपये कर आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर कमी करावेत, असे सांगून आता सांगा महागाई कोणामुळे वाढली, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला. राज्य सरकारने कांदा, ऊस उत्पादकांसाठी काय केले, असा सवाल करत कांद्याला राज्यात भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, असे ते म्हणाले.

सध्या बोलघेवड्या नेत्याची गर्दी वाढली असून बोलणारे खूप आहेत, पण ते तसे वागत नाहीत, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली. पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. शेतकरी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मोदी सरकारने निर्णय घेतले आहेत. मोदींनी गरिबी कल्याणाचा अजेंडा राबविला असून भारताला शक्तीशाली केले आहे. देशाची निर्यात करण्याची ताकद वाढली आहे, असे सांगून अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन केले. परंतु महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन करून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. राज्य सरकार अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्याने आरक्षण रखडले. आरक्षण गेले हे सरकारचे पाप आहे, ठाकरे सरकारने केवळ टाईमपास केला, सरकार फक्त झोपा काढत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

ओबीसी हा भाजपचा डीएनए असून श्वास आहे, असेही ते म्हणाले. मोर्चे काढता मग अहवाल का तयार करत नाही, नवाब मलिकांच्या मंत्रिपदासाठी जेवढे प्रयत्न केले, तेवढे आरक्षणासाठी का केले नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी आरक्षणाचा तिढा सोडविणे गरजेचे आहे. अन्यथा थेट पुढच्या निवडणुकीत आरक्षण मिळेल,असे ते म्हणाले.

काही पक्ष फक्त चिंतन बैठक घेत आहेत. ऑपरेशन यशस्वी झाले, पण रूग्ण मेला, अशी टीका फडणवीस यांनी काँग्रेसच्या उदयपूर येथे पार पडलेल्या शिबिरावर केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button