

टोकियो; पुढारी ऑनलाईन
क्वाड देशांच्या बैठकीदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात टोकियो येथे द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भारत- अमेरिका मैत्री आणखी मजबूत करु असा विश्वास व्यक्त केला. तर कोरोना विरुद्ध भारताच्या लढाईचे बायडेन यांनी कौतुक केले आहे. भारताने कोरोनाची परिस्थिती चीन पेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने हाताळली, असे बायडेन यांनी म्हटले आहे.
अनेक क्षेत्रात दोन्ही देश मिळून एकत्र काम करू शकतात आणि करतील. अमेरिका-भारत यांच्यामधील द्विपक्षीय भागीदारी ही पृथ्वीवरील सर्वात जवळची असेल आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असे बायडेन यांनी म्हटले आहे.
भारत आणि अमेरिकेची भागीदारी ही खऱ्या अर्थाने विश्वासाची भागीदारी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर द्विपक्षीय चर्चा केली.
पंतप्रधान मोदी क्वाड देशांच्या (#QuadSummit) बैठकीत सहभागी झाले आहेत. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची स्थापन केलेली युती म्हणजे क्वाड आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज या बैठकीत सहभागी झाले आहेत.