कौतुकास्पद! सहा वर्षाच्या चिमुकलीमुळे पाच जणांना जीवदान; ठरली सर्वात लहान ‘ऑर्गन डोनर’ | पुढारी

कौतुकास्पद! सहा वर्षाच्या चिमुकलीमुळे पाच जणांना जीवदान; ठरली सर्वात लहान 'ऑर्गन डोनर'

पुढारी ऑनलाईन डेस्क : सहा वर्षाच्या चिमुकलीने ५ जणांना अवयव दान (ऑर्गन डोनर) करत, नवीन जीवदान दिले. ती दिल्ली येथील एम्स रूग्णालयातील सर्वात लहान अवयवदाता ठरली आहे. डोक्याला गोळी लागल्याने ब्रेन डेड घोषित करण्यात आलेल्या ६ वर्षीय रोली प्रजापतीच्या पालकांनी अवयवदानासाठी मान्यता दिली आहे.

नोएडामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी रोली हिच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. यामध्ये तिचा मेंदू मृत झाला. त्यामुळे रोली प्रजापतीच्या पालकांनी आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे रोली ही नवी दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या इतिहासातील सर्वात लहान अवयवदाता ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोलीच्या डोक्यात गोळी लागली, त्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तीव्र दुखापतीमुळे ती कोमात गेली आणि त्यानंतर तिला दिल्लीमधील एम्स रूग्णालयात पाठवण्यात आले. तान्हुलीला वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले.

एम्सचे वरिष्ठ न्यूरो सर्जन डॉ. दिपक गुप्ता यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, “रोली ही साडेसहा वर्षांची चिमुकली २७ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्या डोक्याला गोळी लागली होती. त्यामुळे मेंदूला खोलवर दुखापत झाली होती. यामध्ये मेंदूचे पूर्णपणे नुकसान झाले होते. ती जवळजवळ ब्रेन डेड अवस्थेतच हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. म्हणून आम्ही तिच्या घरातल्यांना याची पूर्वकल्पना दिली.”

दिपक गुप्ता पुढे म्हणाले, “आम्ही मुलीच्या कुटूंबाला सांगितले की, तिच्या ब्रेनला खोलवर मार लागल्याने, तिचा ब्रेन डेड झाला आहे. यातून ती शुध्दीवर येणे अशक्य आहे. त्यानंतर आमच्या डॉक्टरांच्या टीमने तिच्या पालकांसोबत बसून मुलीच्या अवयवदानाबद्दल चर्चा केली. इतर मुलांचे प्राण वाचवण्यासाठी अवयव दान करू, यासाठी ते इच्छुक आहेत का? असे विचारले असता तिच्या पालकांनी अवयवदानासाठी संमती दर्शवली.

त्यानंतर एम्स रूग्णालयातील डॉक्टरांनी या प्रक्रियेची तयारी करत, अवयवदानासाठी (ऑर्गन डोनर) मुलीचे यकृत, मूत्रपिंड, कॉर्निया आणि दोन्ही हृदयाच्या झडपा काढण्याचा निर्णय टीमने घेतला. “अवयवदानाबद्दल फारशी माहिती नसतानाही हे पाऊल उचलल्याबद्दल आम्ही पालकांचे खूप आभारी आहोत, अशा शब्दांत या चिमुकलीने अवयवदान करून पाच जणांचे प्राण वाचवल्याबद्दल एम्सच्या दिपक गुप्ता आणि डॉक्टरांनी रोलीच्या पालकांचे कौतुक केले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button