Gyanvapi mosque survey : 'ज्ञानवापी' प्रकरणी तुर्त कुठलाही आदेश जारी करू नका; सर्वोच्‍च न्‍यायालयाचे वाराणसी कनिष्ठ न्यायालयाला निर्देश | पुढारी

Gyanvapi mosque survey : 'ज्ञानवापी' प्रकरणी तुर्त कुठलाही आदेश जारी करू नका; सर्वोच्‍च न्‍यायालयाचे वाराणसी कनिष्ठ न्यायालयाला निर्देश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिद संबंधी सुरू असलेल्या वादावरील सुनावणी  शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. गुरूवारी सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती सूर्यकांत तसेच न्यायमूर्ती पीएस नरसिंमा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने तूर्त कुठलाही आदेश जारी न करण्याचे निर्देश वाराणसीच्या कनिष्ट न्यायालयाला दिले आहेत.

मुख्य अधिवक्ते हरिशंकर जैन यांची प्रकृती बिघडल्याने वकील विष्णु जैन यांच्या मार्फत सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी हिंदू पक्षाने केली होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजता याप्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. ज्ञानवापी प्रकरणामुळे दुसऱ्या ठिकाणी ही अशाप्रकारच्या याचिका दाखल केल्या जात असल्याचे मुस्लिम पक्षाच्या वतीने हुजेफा अहमदी यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले.

प्रकरणाच्या सुनावणीत विलंब होवू नये, अशी मागणी त्यामुळे त्यांनी केली. वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयात मशिदची भिंत पाडण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात कार्यवाही सुरू असल्याने यासंबंधी आदेश दिला जावू शकतात, असा युक्तीवाद मुस्लिम पक्षाने केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने शुक्रवारपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या कार्यवाहीला स्‍थगिती देत सुनावणी पुढे ढकलली.

वाराणसी न्‍यायालयात सर्वेक्षण अहवाल सादर

‘ज्ञानवापी’ प्रकरणी आज ( दि. १९ ) वाराणसी न्‍यायालय सर्वेक्षण अहवाल सादर करण्‍यात आला. ( Gyanvapi mosque survey ) हा अहवाल १५ पानांचा आहे, अशी माहिती अस्‍टिटंट कोर्ट कमिशनर अजय प्रताप सिंह यांनी दिली. यासंदर्भात माहिती देताना हिंदू पक्षाचे वकील विशाल सिंह यांनी सांगितले की, ” आम्‍ही ज्ञानवापी मशीद सर्वक्षणावेळी करण्‍यात आलेल्‍या व्‍हिडीओ शुटिंगही न्‍यायालयास सादर केले आहे.

वाराणसी न्‍यायालयाने सर्वेक्षण अहवाल सादर करण्‍यास दोन दिवसांची मुदत दिली होते. त्‍याचवेळी कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांना हटविण्‍याचे आदेश दिले. मुस्‍लिम पक्षाच्‍या वतीने मिश्रा यांच्‍या भूमिकेवर आक्षेप घेण्‍यात आला होता. ते पक्षपातीपणा करत असल्‍याचा दावा करण्‍यात आला होता. मशीद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्‍याचा दावा हिंदू पक्षाच्‍या वतीने सोमवार १६ मे रोजी करण्‍यात आला होता. यानंतर हा परिसर सील करण्‍यात यावा, असा आदेश वाराणसी न्‍यायालयाने दिला होता.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button