सातारा : आ. जयकुमार गोरेंना अटकेपासून दिलासा | पुढारी

सातारा : आ. जयकुमार गोरेंना अटकेपासून दिलासा

दहिवडी : पुढारी वृत्तसेवा
मायणी, ता. खटाव येथे मृत व्यक्‍तीची बनावट कागदपत्रे तयार करुन जमिनीचा व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने दि. 9 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. याची अंतिम सुनावणी दि. 9 जून रोजी होणार आहे. या गुन्ह्यात त्यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यावर दुसरा दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, या प्रकरणातील अटकेतील दोन संशयितांना आणखी पोलिस कोठडी वाढवून मिळाली आहे.

मायणी येथील भिसे या व्यक्‍तीचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करुन त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आ. गोरे यांच्यावतीने वडूज येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. तो अर्ज वडूज न्यायालयाने फेटाळून लावल्याने आ. जयकुमार गोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यावर बुधवारी सुनावणी घेत दि. 9 जूनपर्यंत आ. गोरे यांना अटकेपासून संरक्षण दिले. तसेच यावर पुढील सुनावणी दि. 9 जून रोजी होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित दत्तात्रय घुटुगडे व महेश बोराटे हे दोघे वडूज न्यायालयाला शरण आले होते. त्यानंतर दहिवडी पोलिसांनी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले होते.

न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. ही कोठडी संपत आल्याने बुधवारी या दोघा संशयितांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. बुधवारी पोलिसांनी पुन्हा दोन्ही संशयितांची आणखी पोलिस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी कोर्टाकडे केली. यावर दोन्ही पक्षाचा युक्‍तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्‍तिवाद ग्राह्य धरुन दोन्ही संशयितांना दि. 23 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.

Back to top button