LPG Cylinder : घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला, आता मोजावे लागतील ‘इतके’ पैसे! | पुढारी

LPG Cylinder : घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला, आता मोजावे लागतील 'इतके' पैसे!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले असतानाच आता पुन्हा घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत ३.५ रुपयांनी वाढली आहे. यामुळे सिलिंडर आता १,००३ रुपयांवर पोहोचला आहे. याआधी १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये होती. आता त्यात वाढ झाली आहे. नवीन दरवाढ आजपासून लागू झाली आहे.

विनाअनुदानित गॅस सिलिंडर दरात वाढ होऊन काही दिवसही उलटत नाहीत, तोच सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा सिलिंडरचे दर साडेतीन रुपयांनी वाढविले आहेत. याआधी तेल कंपन्यांनी सिलेंडर दरात ५० रुपयांची वाढ केली होती तर गुरुवारी करण्यात आलेली वाढ साडेतीन रुपयांची आहे.

ताज्या दरवाढीनंतर दिल्ली आणि मुंबई येथे १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर १,००३ रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हेच दर १ हजार २९ रुपयांवर तर चेन्नई येथे हे दर १ हजार १८ रुपयांवर गेले आहेत. तेल कंपन्यांनी केवळ विनाअनुदानित गॅस सिलिंडर दरात वाढ केलेली आहे असे नाही तर व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर दरातही आठ रुपयांची वाढ केली आहे.

ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे (LPG Cylinder) दर २,३५४ रुपयांवर गेले आहेत. कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे हे दर क्रमशः २,४५४, २,३०६ आणि २,५०७ रुपयांवर गेले आहेत. याआधी ७ मे रोजी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दर दहा रुपयांनी कमी करण्यात आले होते.

Back to top button