महागाईचा कहर! घाऊक महागाई दर १५ टक्क्यांवर | पुढारी

महागाईचा कहर! घाऊक महागाई दर १५ टक्क्यांवर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरू आहे. 1998 नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाईचा दर (इन्फ्लेशन रेट) 15 टक्क्यांवर गेला आहे. घाऊक मूल्य निर्देशांक 151.9 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात हा दर 14.55 टक्क्यांवर होता. आता तो 15.08 टक्के झाला आहे. डिसेंबर 1998 मध्ये घाऊक महागाई दर 15.32 टक्के होता. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यात हा दर 10.74 टक्के होता. या जीवघेण्या महागार्ईमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.

विशेष म्हणजे अलीकडेच सरकारने किरकोळ महागाई दराचे आकडे जारी केले होते. किरकोळ महागाई निर्देशांक देखील आठ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर गेला होता. सलग 13 व्या महिन्यात घाऊक महागाई दर 10 टक्क्यांंवर राहिलेला आहे, हे विशेष!

खनिज तेल, मूळ धातू, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थ, गैर खाद्य श्रेणीतील वस्तू, खाद्य उत्पादने, रासायनिक पदार्थांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने महागाई दर गगनाला भिडल्याचा दावा अर्थतज्ज्ञांनी केला आहे.

महागाई वेगाने वाढत असल्याचे पाहून रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो दरात अनपेक्षितपणे वाढ केली होती. महागाई आटोक्यात आली नाही तर आरबीआयकडून पतधोरणात पुन्हा हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याआधी 1998 साली घाऊक महागाई दर 15.32 टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर यंदा 24 वर्षांनंतर एप्रिल महिन्यात हा दर 15.08 टक्क्यांवर गेला आहे.

सलग दोन वर्षांपासून जगभरात असलेले कोरोनाचे संकट आणि त्यातच रशिया-युक्रेन दरम्यान चालू असलेले युद्ध यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. झपाट्याने महागाई वाढण्यामागे ही कारणेदेखील आहेत.

Wholesale inflation : घाऊक महागाईने ताेडला ३० वर्षांचा रेकाॅर्ड

Back to top button