नातू दे किंवा ५ कोटी दे ; थेट आई-वडिलांनी अमेरिकेत असलेल्या मुलावर ठोकली केस ! | पुढारी

नातू दे किंवा ५ कोटी दे ; थेट आई-वडिलांनी अमेरिकेत असलेल्या मुलावर ठोकली केस !

हरिद्वार; पुढारी ऑनलाईन : उत्तराखंडमधील एका दाम्पत्यांने आपल्या मुलावर आणि सुनेवर नातवंडासाठी खटला दाखल केला आहे. एक वर्षाच्या आत आम्हाला तू नातू तरी दे अन्यथा नुकसान भरपाई म्हणून ५ कोटी रुपये दे अशी याचिका या दाम्पत्याने कोर्टात दाखल केली आहे. ‘आम्हाला फक्त नातू हवा आहे’ असे एस. आर. प्रसाद यांनी बुधवारी (दि. ११) उत्तराखंडातील न्यायालयात सांगितले. त्यामुळे नातवंडाच्या मागणीसाठी आपल्या पोटच्या मुलावरच दावा ठोकल्याची विचित्र घटना हरिद्वार येथे घडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी माध्यमांशी बोलताना एस. आर. प्रसाद म्हणाले की, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्यानंतर त्याला अमेरिकेत त्याच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्यानंतर आता स्वत: जवळ काहीच पैसे उरलेले नाहीत. आम्ही आमच्या मुलाचे २०१६ साली लग्न करुन दिले. आम्हाला फक्त नातवंड हवे आहे, तो नातू असेल अथवा नात याच्याशी काहीही देणेघेणे नाही.

प्रसाद पुढे म्हणाले, माझ्या मुलाच्या अमेरिकेतील प्रशिक्षणासाठी मी त्याला माझ्याकडील सर्व रक्कम दिली. त्यानंतर घर बांधण्यासाठी मी बँकेकडून कर्ज घेतले. आता मी मोठ्या आर्थिक संकटात सापडलो आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाकडून व सुनेकडून प्रत्येकी अडीच कोटींची मागणी या याचिकेद्वारे केली आहे.

प्रसाद यांचे वकील म्हणाले की, या याचिकेद्वारे आम्ही समाजातील भीषण वास्तव आणि सत्य समोर आणले आहे. आम्ही आमच्या मुलांवर गुंतवणूक करतो, त्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्यास योग्य बनवतो. त्यामुळे मुलांनी पालकांच्या आर्थिक आणि मुलभूत गरजांची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही या याचिकेद्वारे एका वर्षाच्या आत नातू तरी द्या अन्यथा नुकसान भरपाई म्हणून ५ कोटी रक्कम तरी द्यावी अशी मागणी केली असल्याचे, प्रसाद यांचे वकील ए. के. श्रीवास्तव म्हणाले.

Back to top button