

Deoghar Jharkhand Accident
झारखंडमधील देवघरमध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात १८ कावड यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मोहनपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील जमुनिया जंगलाजवळ पहाटे ४.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाबा नगरी देवघर येथील बाबा बैद्यनाथ धाम येथे जलाभिषेक केल्यानंतर कावड यात्रेकरुंची बस दुमका येथील बासुकीनाथ मंदिराच्या दिशेने जलाभिषेक करण्यासाठी जात होती. याचदरम्यान, मोहनपूर पोलीस स्थानक क्षेत्रातील जमुनिया येथे यात्रेकरुंची बस आणि एलपीजी सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात ५ कावड यात्रेकरुंचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी X वर पोस्ट करत दिली आहे. ''माझ्या लोकसभा मतदारसंघातील देवघर येथे श्रावण महिन्यातील कावड यात्रेदरम्यान बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात १८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. बाबा बैद्यनाथजी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.'', असे दुबे यांनी म्हटले आहे.
"देवघरमधील मोहनपूर पोलिस स्थानक हद्दीतील जमुनिया जंगलाजवळ गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला बसने धडक दिल्याने हा अपघात झाला," अशी माहिती दुमका झोनचे महानिरीक्षक शैलेंद्र कुमार सिन्हा यांनी दिली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण अनेक जखमी भाविकांची प्रकृती गंभीर असल्याचेही ते म्हणाले.
या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. या अपघातातील जखमींना जवळची रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेण्यात आले आहे.
सध्या सुरु असलेल्या श्रावण महिन्यात सोमवारी देवघर येथील बाबाधाम मंदिरात सुमारे ३ लाख भाविकांनी दर्शन घेतले.