

बँकॉक; वृत्तसंस्था : थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका प्रसिद्ध फूड मार्केटमध्ये सोमवारी एका बंदूकधार्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात हल्लेखोरासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला. हल्लेखोराने बाजारातील सुरक्षारक्षकांना लक्ष्य केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
बँकॉक पोलिसांनी या घटनेला ‘मास शूटिंग’ म्हटले असून, हल्लेखोराची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हा हल्ला बँकॉकमधील पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण केंद्र असणार्या प्रसिद्ध चटुचक मार्केटजवळच्या ‘ओर तोर कोर’ या फूड मार्केटमध्ये झाला. हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, याचा पोलिस शोध घेत आहेत. थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादाशी या घटनेचा काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास केला जात आहे.