सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून केंद्राकडे २ न्यायमूर्तींची शिफारस | पुढारी

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून केंद्राकडे २ न्यायमूर्तींची शिफारस

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयात लवरकच दोन न्यायमूर्तींची नियुक्ती होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुधांशु धूलिया तसेच गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जमशेद बी. पारदीवाला यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून पदोन्नत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीची किमान स्वीकृत संख्या ३४ आहे.

केंद्र सरकारने न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारसी मान्य केल्या, तर न्यायमूर्ती पारदीवाला भविष्यात देशाचे सरन्यायाधीश देखील होतील. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हाेणारे पारदीवाला पारसी समुदायतील चौथे असतील. गेल्या पाच वर्षात सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बनणारे पारदीवाला अल्पसंख्याक समुदायाचे दुसरे न्यायमूर्ती होतील. न्यायमूर्ती पारदीवाला यांनी वलसाड जेपी महाविद्यालयात पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. १९९४ मध्ये ते गुजरात बार कौन्सिलचे ते सदस्य होते.

तर उत्तराखंड उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होणारे न्यायमूर्ती सुधांशु धूलिया दुसरे न्यायमूर्ती ठरतील. गुवाहाटी उच्च न्यायालयापूर्वी न्यायमूर्ती धूलिया उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिले आहेत. सरन्यायाधीश एन.व्ही.रमन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीत ही नावे मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉलेजियममध्ये न्यायमूर्ती यू.यू.लळित तसेच ए.एम खानविलकर, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड तसेच न्यायमर्ती एल. नागेश्वर राव हाेते.

यावर्षी देशाला तीन सरन्यायाधीश मिळतील. सरन्यायाधीश एन.व्ही.रमन्ना २६ ऑगस्टला निवृत्त होत आहेत. यानंतर न्यायमूर्ती उदय उमेश लळित सरन्यायाधीश होतील. लळित यांच्या सेवानिवृत्तीनंतर नोव्हेंबर महिन्यात न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड सरन्यायाधीश होतील. आणि त्यांचा कार्यकाळ जवळपास दोन वर्षांचा राहील.

हेही वाचा  

Back to top button