देशाच्या वीज मागणीत २० टक्क्यांची अभूतपूर्व वाढ | पुढारी

देशाच्या वीज मागणीत २० टक्क्यांची अभूतपूर्व वाढ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशाच्या वीज मागणीत अभूतपूर्व अशी २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. अशात आयात करण्यात येणाऱ्या कोळश्यावर आधारित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना संपूर्ण क्षमतेत काम करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. विजेसंबंधी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्य तसेच घरगुती कोळश्यावर आधारित सर्व वीज निर्मिती कंपन्यांना एकूण आवश्यकतेपैकी किमान १० टक्के कोळसा आयात करण्याचे निर्देश दिले आहेत.

घरगुती कोळसा उत्पादनात वाढ झाली असली तरी, विजेचे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा साठा मुबलक नाही. विविध भागात त्यामुळे भारनियमन केले जात आहे. वीज निर्मितीसाठी कोळशाची दैनंदिन आवश्यकता तसेच वीजनिर्मिती केंद्रातील उपलब्ध कोळसा साठा यामध्ये ताळमेळ नसल्याने या केंद्रातील कोळशाचा साठा चिंताजनक स्वरूपात कमी होत आहे, असे ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, ओडिसा तसेच झारखंडने त्यांच्या राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरवठा करण्यासाठी अद्याप कुठल्याही निविदा काढलेल्या नसून योग्य ती पावले उचललेली नाहीत. कोळशाच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. १४० अमेरिकी डॉलर प्रति टनापर्यंत हे दर पोहचल्याने कोळशाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. आयातीत कोळश्याच्या आधारावर उत्पादन क्षमता जवळपास १७ हजार ६०० मेगावॅट असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button