पुढारी ऑनलाईन : चंद्र आणि मंगळानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता 'शुक्रयान' मोहीमासाठी सज्ज झाली आहे. शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात येत आहे.सध्या 'शुक्रयान' मोहिम तयार करण्याची आणि प्रक्षेपित करण्याची भारताकडे क्षमता आहे.
इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शुक्र ग्रहाच्या मिशनचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. या मिशनसाठी किती खर्च येईल, हे निश्चित करण्यात आले असून सरकार आणि वैज्ञानिकांचे या मिशनबाबत एकमत आहे. त्यामुळेच या मोहिमेची बांधणी करण्यात येत आहे. या 'शुक्रयाना'च्या शुभारंभासाठी डिसेंबर २०२४ हा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी एका बैठकीदरम्यान सांगितले आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, "शुक्राचे वातावरण अत्यंत विषारी आहे आणि संपूर्ण ग्रह सल्फ्यूरिक ॲसिडच्या ढगांनी झाकलेला आहे. शुक्र ग्रहावर याआधी संशोधन झालेल्या गोष्टींपेक्षा काहीतरी नवीन शोधणे हे आमचे ध्येय आहे. जेणेकरून या मोहिमेचा जागतिक स्तरावर प्रभाव पडेल. शुक्र गृहावर अंतराळयान पाठवण्यासाठी वर्षानुवर्षे संशोधन सुरू आहे. आता या मोहिमेसाठी इस्रोकडे योजना तयार आहे. मंगळयान आणि चांद्रयानसारख्या यशस्वी मोहिमांप्रमाणेच आमची टीम शुक्र मोहिमेवर काम करण्यासाठी असल्याचेही त्यांनी सष्ट म्हणाले.
शुक्र हा पृथ्वीचा जुळा मानला जातो. त्यांचे आकार आणि व्यास हे समान आहे. तसेच, त्यांची रचनादेखील एकमेकांशी साम्य दर्शवते. अमेरिकेसह अनेक देश अनेक वर्षांपासून शुक्रावर संशोधन करत आहेत. या ग्रहावर मोहिमा पाठवून शास्त्रज्ञांना शुक्राचे वातावरण कधी आणि कसे बदलले हे जाणून घ्यायचे आहे. वास्तविक, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की एके काळी शुक्रदेखील पृथ्वीसारखाच होता. मात्र, वातावरणातील बदलामुळे तेथील वातावरण विषारी बनले आहे.
शुक्रावर अवकाशयान पाठवण्याच्या शर्यतीत भारताबरोबर अमेरिका, युरोपही सहभागी आहेत. इस्रो व्यतिरिक्त अमेरिकन अंतराळ संस्था नासा देखील शुक्रावर दोन अंतराळयान पाठवण्याच्या तयारीत आहे. या ग्रहाचा शोध घेण्यासाठी नासाने सुमारे एक अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. हा निधी दोन भागांमध्ये विभागला जाणार आहे. पहिला- DAVINCI+ आणि दुसरा- VERITAS. नासाकडून हे अवकाशयान 2028 ते 2030 दरम्यान लॉन्च केले जाणार आहे.