मनसेच्या संदीप देशपांडेंनी पोलीसांच्या हातातून पळ काढला, पण कार्यकर्ते मात्र लागले गळाला ! | पुढारी

मनसेच्या संदीप देशपांडेंनी पोलीसांच्या हातातून पळ काढला, पण कार्यकर्ते मात्र लागले गळाला !

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंग्यावरून आंदोलन छेडल्यानंतर आज राज्यभरात मनसैनिकांची धरपकड सुरु आहे. अनेक ठिकाणी राज यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी मशिदींमध्ये भोंगा वाजलाच नाही, तर काही ठिकाणी कमी आवाजात भोंगा वाजला. ज्या ठिकाणी भोंगा वाजला, त्या ठिकाणी मनसैनिकांनी चालीसा लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीसांनी तातडीने बंदोबस्त केल्याने अनुचित प्रकार घडला नाही.

अनेक ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. मुंबईत मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनाही पोलीसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलीसांनी चकवा देत स्वत:च्या गाडीतून पळ काढला. या झटापटीत महिला पोलीस जखमी झाली.

राज ठाकरेंच्या निवासस्थानासमोर संदीप देशपांडे माध्यमांशी संवाद साधत असतानाच पोलीस त्या ठिकाणी होते. त्यांनी ताब्यात घेणार असल्याचे सांगताच देशपांडे यांनी सहकार्य करू असे सांगत सोबत येतो असे सांगितले. पण पोलीसांनी वाहनात बसवण्याचा प्रयत्न करताच त्यांनी तेथून पळ काढत खासगी वाहनातून पळून गेले.

संदीप देशपांडे पोलीसांच्या हातातून पळून गेल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. झटापटीत महिला पोलीस जखमी झाल्याने तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे.

तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरुच राहणार : राज ठाकरे

मुंबईतील ११४० पैकी १३५ मशिदींवर आज (दि.४) पहाटे पाचची अजाण झाली. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मनसे नेत्यांवर कारवाई का ? असा सवाल करत जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविले जात नाही, तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज सकाळपासून महाराष्ट्रातील मनसे नेते, पदाधिकारी यांना पोलिसांचे फोन येऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या जात आहेत. परंतु आमच्यावरच कारवाई का केली जात आहे. मुंबईतील ११४० पैकी १३५ मशिदींवर आज पहाटे अजान झाली. त्यांच्यावर कारवाई होणार का ? असा सवालही त्‍यांनी केला. ९० टक्के ठिकाणी सकाळची अजाण झाली नाही. मुंबईतील १००५ मशिदीवर भोंगे लागले नाहीत. त्या मशिदींतील मौलवींचे आभार मानतो, असेही त्‍यांनी नमूद केले.

हे ही वाचलं का ?

Back to top button