दिल्‍ली दंगलीदरम्यान तलवारींचे वाटप करणार्‍या दोघांना अटक | पुढारी

दिल्‍ली दंगलीदरम्यान तलवारींचे वाटप करणार्‍या दोघांना अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर प्राणघातक हल्‍ला करण्यात सामील असलेल्या युनूस आणि शेख सलीम या दोन आरोपींना दिल्‍ली पोलिसांनी अटक केली आहे.

हल्ल्यावेळी या दोघांनी मोठ्या प्रमाणात तलवारींचे वाटप केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जहांगीरपुरी दंगलीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 33 लोकांना अटक केली असून त्यात 3 अल्पवयीनांचा समावेश आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात तीन आरोपी असून त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करीत असताना युनूस आणि शेख सलीम हे दंगलीतील लोकांना तलवारींचे वाटप करताना दिसून आले होते. त्यानुसार सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. युनूसवर याआधीच गंभीर गुन्हे दाखल आहेत. डिजिटल पुराव्यांच्या माध्यमातून इतर आरोपींचीही पोलिस ओळख पटवित आहेत.

जहांगीरपुरीमध्ये 16 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर प्राणघातक हल्‍ला करण्यात आला होता. यात एक नागरिक तसेच 8 पोलिस जखमी झाले होते. घटनास्थळी गाड्यांची जाळपोळ करीत दगडफेक करण्यात आली होती. पाच दंगलखोरांविरोधात पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कलम लावलेले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button