केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला वीज संकटाचा आढावा | पुढारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला वीज संकटाचा आढावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : देशातील अनेक राज्यांत निर्माण झालेल्या वीज संकटाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आढावा घेतला. कडक उन्हाळ्यामुळे एकीकडे विजेची मागणी वाढली आहे तर दुसरीकडे कोळशाच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे वीज उत्पादनावर परिणाम झालेला आहे. या पार्श्‍वभूमीवर काही राज्यांत तासन्तास लोड शेडिंग करावे लागत आहे. अमित शहा यांनी बोलाविलेल्या बैठकीस ऊर्जा मंत्री आर. के. सिंग, रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

उत्‍तर भारतातील अनेक राज्यांत विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक राज्यांत ही मागणी विक्रमी स्तरावर गेलेली आहे. मागणीच्या तुलनेत विजेचा पुरवठा करणे वीज उत्पादक प्रकल्पांना अशक्य होत आहे. याचे कारण म्हणजे कोळशाचा अपुरा पुरवठा हे होय.

जागतिक बाजारात कोळशाचे दर वाढल्याने कोळसा आयात करण्यात अडथळे येत आहेत तर देशातंर्गत कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेचे डबे कमी पडत आहेत. अलिकडेच रेल्वेने असंख्य पॅसेंजर गाड्या रद्द करुन कोळसा वाहतुकीस प्राधान्य देण्याचा निर्णयदेखील घेतला होता.

हे ही वाचलं का ?

Back to top button