सीआयएल : चिंता नको ! देशात कोळसा मुबलक, केंद्रीय खाण मंत्र्यांची घोषणा | पुढारी

सीआयएल : चिंता नको ! देशात कोळसा मुबलक, केंद्रीय खाण मंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात सध्या कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल), सिंगरेनी कोलरीज कंपनी लिमिटेड (एससीसीएल), कोळसा वॉशरीज अशा विविध स्त्रोतांमध्ये ७२.५९ दशलक्ष टन कोळसा उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (दि.२३) शनिवारी दिली. देशात जवळपास महिनाभर टिकेल एवढ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध असून कोळशाचे विक्रमी उत्पादन घेत मागणीची पूर्तता केली जात असल्याचे ट्विट जोशी यांनी केले आहे.

देशातील औष्णिक उर्जा प्रकल्पांमध्ये (टीपीपी) २२.०१ दशलक्ष टन कोळसा उपलब्ध असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात कोळशाचे एकूण उत्पादन ८.५५ टक्क्यांनी वाढले. वर्षभरात ७७७.२३ दशलक्ष टन उत्पादन घेण्यात आले.

२०२०-२१ मध्ये हे उत्पादन ७१६ मेट्रिक टन एवढे होते. कोल इंडिया लिमिटेडचे (सीआयएल) उत्पादन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४.४३ टक्क्यांनी वाढून ६२२.६४ मेट्रिक टन झाले आहे. २०२०-२१ मध्ये ते ५९६.२४ मेट्रिक टन एवढे होते.

सिंगरेनी कॉलरीज कंपनी लिमिटेडने (एसीसीएल) २८.५५% वाढीसह ६५.०२ मेट्रिक टन उत्पादन काढले. २०२१-२२ या वर्षात हे उत्पादन ५०.५८ दशलक्ष टन एवढे होते. तर, बंदिस्त खाणींतील कोळसा उत्पादन ८९.५७ मेट्रिक टन आहे. २०२०-२१ मध्ये ते फक्त ६९.१८ दशलक्ष टन इतके होते.

२०२१-२२ मध्ये एकूण ८१८.०४ मेट्रिक टन इतका कोळसा विविध ठिकाणी पाठवण्यात आला.गतवर्षी हे प्रमाण ६९०.७१ मेट्रिक टन एवढे होते.यंदाच्या कोळसा पुरवठ्यात १८.४३ टक्क्यांची वाढ झाल्याचे मंत्रालयाकडून नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत, सीआयएलने २०२०-२१ मधील ५७३.८० मेट्रिक टनच्या तुलनेत ६६१.८५ मेट्रिक टन कोळसा पाठवला असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button