जनरल मनोज पांडे यांनी लष्कर प्रमुखपदाचा, तर सुमन बेरींनी घेतला नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार | पुढारी

जनरल मनोज पांडे यांनी लष्कर प्रमुखपदाचा, तर सुमन बेरींनी घेतला नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : जनरल मनोज पांडे यांनी लष्कर प्रमुखपदाचा तर सुमन बेरी यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार आज घेतला. मूळचे महाराष्ट्राचे असलेल्या जनरल पांडे यांनी मावळते लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. पांडे यांना नंतर साऊथ ब्लॉकच्या लॉनमध्ये मानवंदना देण्यात आली.

जनरल पांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विद्यमान, आपत्कालीन तसेच दीर्घकालीन आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लष्कराला सुसज्ज बनविण्यास आपण प्राधान्य देऊ, असे सांगितले. लष्करी क्षमतेत वृद्धी, त्याचे आधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना आत्मनिर्भरतेला अग्रक्रम देणे, यावरही भर दिला जाणार असल्याचे पांडे यांनी नमूद केले. दरम्यान प्रख्यात अर्थतज्ञ सुमन बेरी यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला आहे. बेरी यांनी याआधी नॅशनल कौन्सिल ऑफ ऍप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च संस्थेत महासंचालक म्हणून तसेच रॉयल डच शेल कंपनीत ग्लोबल चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून काम पाहिलेले आहे.

पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती, सांख्यिकी आयोग, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी काम केल्याचा अनुभवही बेरी यांच्याकडे आहे. मावळते उपाध्यक्ष राजीव कुमार यांची जागा बेरी यांनी घेतली आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये राजीव कुमार यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला होता. अरविंद पांगरिया यांची जागा राजीव कुमार यांनी घेतली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button