Electric bike : इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटनांची सखोल चौकशी होणार : अरमाने | पुढारी

Electric bike : इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटनांची सखोल चौकशी होणार : अरमाने

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
(Electric bike ) अशा सर्व घटनांची सखोल चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे सचिव गिरीधर अरमाने यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

Electric bike : देशात ईव्ही उद्योग कल्पनेपलीकडे वाढेल

इलेक्ट्रिक दुचाकींना (Electric bike)  आग लागण्याच्या घटनांमुळे देशाच्या ईव्ही उद्योगाला धक्का बसला आहे काय, असे विचारले असता अरमाने यांनी हा तात्पुरता सेटबॅक असून, देशाचा ईव्ही उद्योग वेगाने आणि कल्पनेपलीकडे वाढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला. आग लागण्याच्या घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांच्या एका समितीची स्थापना करण्यात आली असून, लवकरच ही समिती सरकारला आपला अहवाल सादर करेल. गाड्यांचे डिझाइन, गाडी निर्मात्यांचे व्यवस्थापन, बॅटरी तसेच प्रत्यक्ष गाड्यांची निर्मिती आदी मुद्दे समितीकडून तपासले जात आहेत. या आधारावर समिती आवश्यक त्या शिफारशी करणार आहे. ज्या कंपन्या सदोष गाड्यांची निर्मिती करीत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला आहे.

ओला इलेक्ट्रिक कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या एका दुचाकीला गेल्या महिन्यात पुणे येथे आग लागली होती. त्या घटनेची देखील चौकशी सुरू असल्याचे अरमाने यांनी सांगितले. दरम्यान, अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात अरमाने यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २१ हजार कोटी रुपयांच्या ऍसेट मोनेटायझेशनचे काम केले जाणार असल्याचे नमूद केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button