

17 Killed In Massive Fire At Building Near Hyderabad s Iconic Charminar
हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनारजवळील गुलजार हौज परिसरात शनिवारी (दि. 18) सकाळी भीषण आग लागली. निवासी आणि व्यावसायिक वापराच्या इमारतीला लागलेल्या आगीत किमान 17 जणांचा मृत्यू झाल्याचे एनडीटीव्हीने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आग सकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास लागली , ज्याचे संभाव्य कारण शॉर्ट सर्किट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुलजार हौज परिसरातील ही इमारत निवासी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारची होती.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने 11 बंब घटनास्थळी पाठवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या दरम्यान, अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर काही जण बेशुद्ध अवस्थेत आढळले.
जखमींना डीआरडीओ रुग्णालय, उस्मानिया जनरल रुग्णालय आणि एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे की आगीचे मुख्य कारण शॉर्ट सर्किट आहे, ज्याची सविस्तर चौकशी सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत प्रशासनाला तातडीने मदतकार्य आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
या दुर्घटनेमुळे हैदराबादमधील जुन्या शहर परिसरातील इमारतींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.
केंद्रीय मंत्री आणि राज्य भाजप अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सांगितले की आग एका ज्वेलरी दुकानातून लागली. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर दुकानाचे मालक त्यांच्या कुटुंबियांस राहत होते. ते म्हणाले, ‘ही एक मोठी दुर्घटना आहे ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि काही जण जखमी झाले आहेत. मी कोणालाही दोष देत नाही, परंतु हैदराबाद ज्या पद्धतीने वेगाने विकसित होत आहे, त्यामुळे पोलिस, नगरपालिका, अग्निशमन आणि वीज विभागांना आणखी बळकटी देण्याची गरज आहे.’