

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यापुर्वी पाकिस्तानला त्याची माहिती दिली होती, अशा आशयाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे एक कथित वक्तव्य व्हायरल झाले. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्याचा दाखला देत परराष्ट्र मंत्र्यांसह सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मात्र एस. जयशंकर यांचे हे वक्तव्य फेक आहे, अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य त्यांनी केले नाही, असा दावा पीआयबीने केला. दरम्यान, या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
परराष्ट्रमंत्र्यांच्या कथित वक्तव्याच्या व्हिडीओ शेअर करत ‘भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यापुर्वी त्यांना माहिती देणे हा गुन्हा होता. भारत सरकारने तसे केल्याची कबुली परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीरपणे दिली. मात्र असे करण्याला कोणी परवानगी दिली? परिणामी आमच्या हवाई दलाचे किती नुकसान झाले?’ असे प्रश्न विचारत राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्र्यांसह भारत सरकारवर हल्ला चढवला.
वहायरल झालेल्या कथित वक्तव्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानला सांगितले की आम्ही दहशतवादी तळांवर कारवाई करत आहोत. आम्ही पाकिस्तानच्या सेनेवर हल्ला करत नाही. त्यामुळे त्यांच्या सेनेकडे यापासून दूर राहण्याचा आणि यात लक्ष न घालण्याचा पर्याय आहे. मात्र पाकिस्तानने या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला.
पीआयबी फॅक्ट चेक विभागाने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल केलेल्या कथित विधानाचे पूर्णपणे खंडन केले. परराष्ट्रमंत्र्यांनी हे विधान केलेले नाही. सोशल मीडिया पोस्टवरून परराष्ट्रमंत्र्यांचे चुकीचे वक्तव्य फिरत आहेत. फसव्या माहितीला बळी पडू नका, असेही पीआयबी फॅक्ट चेक विभागाने म्हटले आहे. पीआयबीने सांगितल्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेले विधान पूर्णपणे खोटे आहे. मात्र या घटनेमुळे खोट्या बातम्यांचा प्रसार आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीच्या गैरवापराबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः जेव्हा हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीशी संबंधित असते, तेव्हा अशी बनावट विधाने आणि व्हिडिओ प्रंचड नुकसानीचे ठरू शकतात.