

Monsoon Updates
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने आणखी काही भागात प्रगती केली आहे. शनिवारी १७ मे रोजी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटांचा उर्वरित भाग आणि अंदमान समुद्र; तसेच पूर्व-मध्य बंगाल उपसागराचा काही भाग व्यापला आहे.
पुढील ३-४ दिवसांत दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत, मालदीव आणि कोमोरिन भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग; मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि ईशान्य बंगाल उपसागराच्या काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, वायव्य भारतातील काही भागात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरुच आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत सर्व दूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (५०-६० किमी प्रतितास वेग) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.
कोल्हापूरमध्ये शनिवारी जोरदार आणि तेथून पुढे ३ दिवस २० मे पर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर २१ मे रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा आणि जिल्ह्याच्या घाट भागात आज, उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात रविवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.