NIT पाटणामध्ये विक्रमी प्लेसमेंट! विद्यार्थ्याला ‘अ‍ॅमेझॉन’नं ऑफर केली १.८ कोटी पगाराची नोकरी | पुढारी

NIT पाटणामध्ये विक्रमी प्लेसमेंट! विद्यार्थ्याला 'अ‍ॅमेझॉन'नं ऑफर केली १.८ कोटी पगाराची नोकरी

पाटणा; पुढारी ऑनलाईन

बिहारमधील पाटणा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) मधील अभिषेक कुमार या विद्यार्थ्याला Amazon या ई-कॉमर्स कंपनीकडून मोठी ऑफर मिळाली आहे. अ‍ॅमेझॉननं अभिषेकला आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल १.८ कोटी रुपये पगाराची नोकरी ऑफर केली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अ‍ॅमेझॉननं कोडिंग परीक्षा घेतली होती. कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या अभिषेकने ही परीक्षा दिली होती. परिक्षेत पात्र ठरल्यानंतर त्याने एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलाखतीच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या. त्यानंतर अभिषेकला २१ एप्रिल रोजी अ‍ॅमेझॉन जर्मनीकडून नोकरीच्या ऑफरचा फायनल कॉल आला. अभिषेकला विक्रमी १.८ कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर मिळालीय.

याआधी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आदिती तिवारी हिच्या नावावर सर्वाधिक पॅकेज मिळवण्याचा विक्रम होता. तिला फेसबुकने वार्षिक १.६ कोटी रुपयांच्या पगाराचे पॅकेज दिले होते. अदितीच्या आधी सर्वाधिक पॅकेज मिळवण्याचा विक्रम पाटणाच्या संप्रीती यादव हिच्या नावावर होता. तिला गुगलकडून १.१ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले होते.

पाटणा NIT साठी हे वर्ष विक्रमी वर्ष ठरले असून संस्थेने १३० टक्के एकूण प्लेसमेंट मिळवले आहेत. कोरोनामुळे NIT मधील कॅम्पस प्लेसमेंटला मोठा फटका बसला होता. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येऊन विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून दिग्गज कंपन्यातून मोठ्या ऑफर मिळत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button