जम्‍मू-काश्‍मीरमधील तरुणाईला जुन्‍या समस्‍यांचा सामना करावा लागणार नाही : पंतप्रधान मोदी | पुढारी

जम्‍मू-काश्‍मीरमधील तरुणाईला जुन्‍या समस्‍यांचा सामना करावा लागणार नाही : पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तुमच्‍या आजी-आजोबा, आई-वडिलांना ज्‍या समस्‍यांचा सामना करावा लागला त्‍याचा सामना तुम्‍हाला करावा लागणार नाही. कधी काळी दिल्‍लीतून सरकारी फाईल जम्‍मू-काश्‍मीरला पोहचायला दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागत असे. आता ५०० किलोवॅटचा सौर उर्जा प्रकल्‍प हा केवळ तीन आठवड्यात सुरु होत आहे. पुढील २५ वर्षांमध्‍ये जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये विकासाची नवी कथा लिहिली जाईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्‍यक्‍त केला. जम्‍मू-काश्‍मीरमधील सांबा जिल्‍ह्यातील चिल्‍ली येथे जाहीर सभेत ते बोलत होते. राज्‍यात ३७० कलम हटविल्‍यानंतर त्‍यांची ही पहिलीच जाहीर सभा होती.

कलम ३७० हटविल्‍यानंतर राज्‍यात लोकशाही मजबूत

या वेळी पंतप्रधान म्‍हणाले, “सांबा जिल्‍ह्यातील पल्‍ली ग्राम पंचायतची वाटचाल ही देशातील पहिली कार्बन न्‍यूट्रल ग्राम पंचायत होण्‍याकडे सुरु आहे. विविध विकास कामांना राज्‍यात प्रारंभ झाला असून, यासाठी मी राज्‍यातील नागरिकांना शुभेच्‍छा देतो. यावर्षी आम्‍ही पंचायत राज दिवस हा जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये साजरा करत आहोत, हेच बदलाचे प्रतीक आहे. मी येथून देशातील सर्व ग्राम पंचायतींबरोबर संवाद साधत आहे. जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये कलम ३७० हटविल्‍यानंतर राज्‍यात लोकशाही मजबूत झाल्‍याचे हे प्रतीक आहे. जम्‍मू-काश्‍मीरच्‍या तळागाळात लोकशाही पोहचली आहे”.

जम्‍मू-काश्‍मीरमधील अनेक कुटुंबाना आता प्रॉपर्टी कार्ड मिळत आहे. राज्‍यात १०० जनऔषध केंद्रांमुळे गरीब आणि मध्‍य वर्गीयांना स्‍वस्‍त औषध आणि शस्‍त्रक्रियेचे साहित्‍य उपलब्‍ध होवू शकते, असेही त्‍यांनी सांगितले.

केवळ दोन वर्षांमध्‍ये जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये ३८ हजार कोटींचा खासगी गुंतवणूक

मागील सात दशकांमध्‍ये जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये १७ हजार कोटी रुपये खासगी क्षेत्रात गुंतवणूक झाली होती. मात्र मागील दोन वर्षांमध्‍ये हा आकडा ३८ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. केंद्र सरकारच्‍या विविध योजनांची तत्‍काळ अंमलबजावणी होत आहे. याचा फायदा राज्‍यातील ग्रामीण भागाला होत आहे.

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये अनेक वर्ष आरक्षणापासून लाभार्थी वंचित राहिले. मात्र मागील तीन वर्षांमध्‍ये त्‍यांना त्‍यांचा हक्‍क मिळत आहे. राज्‍यातील प्रत्‍येक नागरिकाला सशक्‍त बनविण्‍यासाठी आम्‍ही येथे अन्‍य राज्‍यात लागू असणार्‍या पावने दोनशे कायद्‍यांची अंमलबजावणी सुरु केली आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून राज्‍यात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. असेही त्‍यांनी नमूद केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते दिल्‍ली-कटरा एक्‍सप्रेस वे, क्‍वार येथील ५४० मेगावॅट जल विद्‍युत योजनेचे भूमिपूजन, ५०० किलोवॅटचे सौर उर्जा प्रकल्‍प, २ हजार २७ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्‍या काजीगुंड-बनिहाल येथील ८.४५ टनलचे उद्‍घाटन झाले. १०८ जनऔषध केंद्रा’चे लोकार्पणही त्‍यांनी केले.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

Back to top button