मुंबई : ‘मातोश्री’बाहेर लाखो नव्हे, केवळ 235 शिवसैनिक; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा | पुढारी

मुंबई : ‘मातोश्री’बाहेर लाखो नव्हे, केवळ 235 शिवसैनिक; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि त्यांचेच नेते राणा दाम्पत्याला धमक्या देत आहेत. राणा दाम्पत्य खासदार आणि आमदार आहे. त्यांच्या जीविताला अपाय झाला, तर त्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. ‘मातोश्री’बाहेर लाखो शिवसैनिक जमले असल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. त्यात काहीच तथ्य नाही. तेथे केवळ 235 शिवसैनिक होते, असा दावा त्यांनी केला.

हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आलेल्या राणा दाम्पत्याला शिवसेनेेने दिवसभर घरात कोंडून ठेवले. सत्तेवर असलेल्या शिवसेनेची सध्या दादागिरी सुरू आहे. राज्यातील वातावरण तापले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे; पण त्यांचेच नेते धमक्या देत आहेत. राणा दाम्पत्याला सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सुरक्षा तर राहिली दूरच; पण त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत.

या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. गुन्हा दाखल करण्याइतपत त्यांचा गुन्हा काय, असा सवाल राणे यांनी केला.
राज्यात सरकार आहे, असे वाटत नाही. राऊत, परब यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे, याचेही भान नाही. राऊत हे थेट स्मशानात पोहोचविण्याची भाषा करत आहेत. या धमक्या नाहीत का? माफी मागितली नाही तर घराबाहेर पडू देणार नाही, ही धमकी नाही, हा गुन्हा नाही का? राज्यात पोलिस आहेत की नाही, असे सवाल राणे यांनी केले.

लाखो नव्हे, 235 शिवसैनिक

‘मातोश्री’बाहेर लाखो शिवसैनिक जमले असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे; पण ते खोटे आहे. मी पूर्ण माहिती काढली आहे. ‘मातोश्री’बाहेर 235 शिवसैनिक होते आणि अमरावतीला राणा यांच्या घराबाहेर 125 शिवसैनिक होते, असा दावा नारायण राणे यांनी केला.

जंगलातल्या भारावून टाकणाऱ्या अचाट गोष्टी : अभिनेता हृदयनाथ जाधवसोबत | Ratris Khel Chale Fame Actor

Back to top button