चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर, पण दहा लाखांचा दंड | पुढारी

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर, पण दहा लाखांचा दंड

रांची; पुढारी ऑनलाईन: चारा घोटाळ्याशी संबंधित दोरांडा कोषागारातून बेकायदेशीर पैसे काढल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. या प्रकरणी २१ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांचा जामीन मंजूर केला आहे. पण त्यांना दहा लाख रुपयाचा दंड भरावा लागणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

जामीन मिळाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या वकिलांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, झारखंड उच्च न्यायालयाने अर्धी शिक्षा पूर्ण केल्याने आणि आरोग्याच्या समस्यांमुळे लालू प्रसाद यादव यांचा जामीन मंजूर केला. मात्र लालू यांना १ लाख रुपयांची सुरक्षा ठेव आणि १० लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. लवकरच त्याची सुटका होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

चारा घोटाळ्यातील डोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे पैसे काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यांना सीबीआय न्यायालयाने पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड ठोठावला होता. यानंतर चारा घोटाळ्याबाबत झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.

लालू यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे एकूण पाच गुन्हे दाखल झाल्याने ते शिक्षा भोगत होते. या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील करून जामीन अर्ज दाखल केला होता. अर्धी शिक्षा भोगल्यानंतर आणि प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागितला होता. लालू प्रसाद सध्या दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button