दिल्‍लीतील जहांगीरपुरीमध्‍ये पोलिसांवर पुन्‍हा दगडफेक, परिसरात तणाव | पुढारी

दिल्‍लीतील जहांगीरपुरीमध्‍ये पोलिसांवर पुन्‍हा दगडफेक, परिसरात तणाव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील जहांगीरपुरी परिसरात आज पुन्‍हा एकदा पोलिस कर्मचार्‍यांवर दगडफेक करण्‍यात आली. यामुळे येथे पुन्‍हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्‍यान, आज सकाळी हिंसाचार झालेल्‍या भागात फॉरेंसिक टीमने पाहणी केली असून पोलिस बंदोबस्‍तातही वाढ करण्‍यात आली आहे.

दिल्‍लीतील जहांगीरपुरी परिसरात शनिवारी हनुमान जयंती दिवशी काढण्‍यात आलेल्‍या शोभायात्रेवर दगडफेक करण्‍यात आली होती. यावेळी झालेल्‍या हिंसाचारात ९ जण जखमी झाले होते. यामध्‍ये ८ पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाच्‍या हाताला गोळी लागली. याप्रकरणी आतापर्यंत २१ जणांना अटक करण्‍यात आली आहे. यातील दोन संशयित आरोपी हे अल्‍पवयीन आहेत. या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी दिल्‍ली पोलिसांनी १० टीम स्‍थापन केल्‍या आहेत. आज सकाळी याप्रकरणील संशयित महिला आरोपीला अटक करण्‍यासाठी पोलिस पथक परिसरात गेले होते. त्‍यावेळी काही घरांमधून पोलिसांवर दगडफेक करण्‍यात आली. त्‍यामुळे परिसरात तणाव वाढला.

सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल

दिल्‍लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरण आता सर्वोच्‍च न्‍यायालयात पोहचले आहे. या हिंसाचारप्रकरणाच्‍या चौकशीसाठी
न्‍यायमूर्तींच्‍या अध्‍यक्षतेखालील स्‍वतंत्र समिती स्‍थापन करावी,अशी मागणी वकील अमृतपाल सिंह खालसा यांनी दाखल केलेल्‍या याचिकेमध्‍ये करण्‍यात आली आहे.

याचिकेत म्‍हटलं आहे की, दिल्‍लीत २०२० मध्‍ये दंगल झाली होती. यावेळी न्‍यायालयाने दंगल रोखता आली नाही म्‍हणून दिल्‍ली पोलिसांना फटकारले होते. पोलिसांचा प्रतीमाच मलिन झाली असल्‍याने सर्वसामान्‍य नागरिकांचा त्‍यांच्‍यावरील विश्‍वास उडाला आहे. दिल्‍ली पोलिसांनी आजपर्यंत दंगलीचा केलेला तपास हा पक्षपात करणार आहे. तसेच दंगली घडवून आणणार्‍यांचा बचाव करणार आहे, असाही आरोप याचिकेतून करण्‍यात आला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button