Contractor Santosh Patil’s death case : कर्नाटकात राजकीय भूकंप; कंत्राटदार आत्महत्याप्रकरणी भाजप मंत्र्याचा राजीनाम्याचा निर्णय

Contractor Santosh Patil’s death case : कर्नाटकात राजकीय भूकंप; कंत्राटदार आत्महत्याप्रकरणी भाजप मंत्र्याचा राजीनाम्याचा निर्णय

बंगळूर; पुढारी ऑनलाईन

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी (Contractor Santosh Patil's death case)  कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायतराजमंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांनी स्वतःहून राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. ते आज संध्याकाळी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. चौकशीनंतर सर्व काही समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी काँग्रेसने राज्यभर ईश्‍वरप्पांविरुद्ध आंदोलन छेडले आहे. तथापि, ईश्‍वरप्पा यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतल्याने विरोधक आक्रमक झाले होते.

काँग्रेसच्या कार्यकाळात डीएसपी गणपती यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांनी राजीनामा दिला होता. त्याच न्यायाने संतोष पाटील यांनी मंत्र्यांवर थेट कमिशनचा आरोप केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कर्नाटकात तापलेल्या वातावरणाची माहिती दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी मागवली आहे. मंत्री ईश्वरप्पांविरुद्ध उडुपी पोलिसांत भादंवि ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात आली आहे.

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरण (Contractor Santosh Patil's death case) सीबीआय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे सोपवावे. संतोष यांच्या कुटुंबीयांना २ कोटींची नुकसान भरपाई द्यावी. शिवाय त्यांनी केलेल्या कामाचे सर्व बिल देण्याची मागणी राज्य कंत्राटदार संघाचे अध्यक्ष केंपण्णा यांनी सरकारकडे केली आहे. ते म्हणाले, निविदेसाठी ५ टक्के कमिशनची मागणी केली जाते. आरोग्य खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे. पाटबंधारे खात्यामध्येही लाच मागितली जाते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आतापर्यंत चारवेळा तक्रार केली आहे. पण, काहीच उपयोग झाला नाही.

कंत्राटदार संतोष पाटील यांना ओळखत नाही. त्यांच्याशी कोणताही व्यवहार केला नाही. असे असतानाही आपले नाव पुढे करून त्यांनी आत्महत्या केली. याबाबतच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. पण, मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे के. एस. ईश्‍वरप्पा यांनी म्हटले होते. ते म्हणाले होते की, संतोष यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिलेली नाही. मोबाईलवर संदेश रवाना केला आहे. पण, तो संदेश कुणी पाठवला, याबाबत कोणतेही पुरावे नाहीत. हे राजकीय षड्यंत्र आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news