कर्नाटक : ईश्‍वरप्पांसह तिघांविरुद्ध अखेर गुन्हा | पुढारी

कर्नाटक : ईश्‍वरप्पांसह तिघांविरुद्ध अखेर गुन्हा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेले राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांच्याविरोधात उडपी शहर पोलिस ठाण्यांत बुधवारी मध्यरात्री 2.20 वा. एफआयआर दाखल झाला. त्यांच्यासमवेत ईश्‍वरप्पांचे नातेवाईक बसवराज, स्वीय सहायक रमेश यांच्यासह अन्य काही जणांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

कोण संतोष पाटील असे म्हणणारे मंत्री ईश्‍वराप्पा यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारण, एफआयआरमध्ये थेट 40 टक्के कमिशनचा उल्लेख झाल्याने हे प्रकरण आता राज्यासह देशभर गाजते आहे. या सर्वांवर आयपीसी 1860 नुसार 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर सहकलम 34 देखील लावलेले आहे. दरम्यान, चिंतन शिबिरासाठी बेळगावात जमलेले ज्येष्ठ भाजप नेते, मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांसमोर चिंतनऐवजी चिंता वाढली आहे. काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते बेळगावात ठिय्या मांडून बसले असून मंत्री व त्यांच्या नातलगांना लवकर अटक करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संशयास्पद मृत्यूची नोंद

संतोष पाटील हे त्यांचे मित्र संतोष व प्रशांत या दोघांसोबत उडपीला पर्यटनासाठी गेले होते. उडपी बस स्थानकाजवळील शांभवी लॉजमधील खोली क्रमांक 207 मध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे. संतोष पाटील यांचे भाऊ प्रशांत गौडाप्पा पाटील यांनी उडपी येथे जाऊन फिर्याद दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली.

एफआयआरमध्ये तपशील

उडपी पोलिसांनी एफआयआरमध्ये तपशील नमूद केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, 2020-21 मध्ये हिंडलगा पंचायतीच्या व्याप्तीत येणार्‍या हिंडलगा येथे श्री लक्ष्मी यात्रा होती. 100 वर्षानंतर ही यात्रा होत असल्याने गावातील ज्येष्ठ पंचमंडळी, काही स्वामी व लोकप्रतिनिधी तेव्हा ग्रामविकासमंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांना भेटण्यासाठी बंगळूरला गेले होते. या सर्वांनी त्यांना यात्रेचा विषय बोलताना हिंडलगा गावच्या हद्दीत येणारे सर्व रस्ते, गटारी यात्रेपूर्वी होण्याची गरज व्यक्त केली. तेव्हा मंत्री ईश्‍वरप्पा यांनी, तुम्ही आमचे कार्यकर्ते आहात, तुम्ही कामाला सुरुवात करा, यासाठी जितका निधी लागेल तो मंजूर करून देतो, कितीही खर्च झाला तरी तो देऊ, तुम्ही काम सुरू करा, असे सांगितले होते. ही सर्व मंडळी पुन्हा गावात येऊन त्यांनी कंत्राटदार संतोष पाटील यांना काम करण्याची विनंती केली. त्यानुसार संतोष पाटील काही उपकंत्राटदारांना सोबत घेऊन वर्क ऑर्डर नसताना इतरांकडून उसनवारी करून तब्बल 4 कोटी रुपये खर्चून ही कामे करून घेतली.

40 टक्के कमिशनची मागणी

रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर संतोष पाटील हे सातत्याने बंगळूरला जात होते. मंत्री ईश्‍वरप्पा, त्यांचे नातेवाईक बसवराज व रमेश यांना अनेकदा भेटून बिल मंजूर करून द्या, असे सांगितले. यावेळी या सर्वांनी तुझे काम असेच होणार नाही. तू आम्हाला 40 टक्के कमिशन दिलास तरच तुझे बिल मंजूर होईल, अन्यथा ते मंजूर होणार नाही, असेच सांगितले.

पंतप्रधान कार्यालय ते वरिष्ठांकडे तक्रार

संतोष पाटील यांनी आधीच इतरांकडून उसनवारी रक्कम घेऊन हिंडलग्यातील रस्ताकाम पूर्ण केले होते. त्यामुळे येणार्‍या रक्कमेतील 40 टक्के कमिशन कोठून द्यायचे या विवंचनेतून ते अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी 15 दिवसांपूर्वी 40 टक्के कमिशनचा मुद्दा माध्यमांसमोर आणला. इतके करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी दिल्लीला जाऊन राज्याचे प्रभारी अरुण सिंग, पंतप्रधान कार्यालय तसेच अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री व अधिकार्‍यांना भेटून बिल मंजूर करण्याची विनंती केल्याचाही उल्लेख एफआयआरमध्ये आहे. या सर्वांना त्यांनी 40 टक्के कमिशनची बाब सांगूनही कोणीही त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नसल्याचेही तक्रारअर्जात म्हटले आहे. तो उल्लेख एफआयआरमध्येही आलेला आहे.

गुरुवारी पहाटे शव बेळगावात

संतोष पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून बुधवारी सायंकाळी नऊच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी पहाटे शव बेळगावात पोहोचणार असून, त्यानंतर अंत्यसंस्कार कधी होणार? याचा निर्णय होणार आहे.

बडस खुर्दला प्रतीक्षा

संतोष पाटील हे समर्थ कॉलनी हिंडलगा येथे राहात असले, तरी ते मूळचे बडस खुर्द येथील होते. व्यवसायासाठी ते बेळगावला स्थायिक झाले होते. त्यांचे शव कधी येणार, ही प्रतीक्षा त्यांच्या मूळ गावालाही लागून राहिली आहे.
तक्रारअर्जात म्हटले आहे. तो उल्लेख एफआयआरमध्येही आलेला आहे.

माझ्या पतीची आत्महत्या नव्हे, तर मंत्र्यांकडून खून

घरातील दागिने विकून, गहाण ठेवून रस्ते काम केले. परंतु, त्याचे बिल देण्यासाठी 40 टक्के कमिशन मागितले. याला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. परंतु, ही आत्महत्या नसून ग्रामविकासमंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांनी खून केला आहे, असा गंभीर आरोप मृत कंत्राटदाराची पत्नी जयश्री संतोष पाटील यांनी केला आहे. माझे पती सतत बंगळूरला जायचे, कशासाठी जाता, असे विचारले तर रस्ताकामाचे बिल अडकले आहे, असे सांगायचे. त्यांच्याकडे मंत्री व त्यांचे साथीदार 40 टक्के कमिशन मागत असल्याचे त्यांनी मलाही सांगितले होते. परंतु, त्यांनी उडपी येथे जाऊन डेथनोट लिहून आपले जीवन संपवले. अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन आता मी कसे जगायचे, असा भावनिक प्रश्‍न करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

मंत्री ईश्‍वरप्पांचे घूमजाव

पंधरवड्यापूर्वी जेव्हा 40 टक्के कमिशनचा मुद्दा समोर आला तेव्हा कोण संतोष पाटील, आपण त्याला ओळखत नाही, असा पवित्रा मंत्री ईश्‍वरप्पांनी घेतला. मंगळवारी आत्महत्येचे वृत्त प्रसारित होताच मला काहीही माहिती नाही, असे सांगून हात वर केले. परंतु, एफआयआरमधील सर्व तपशील पाहता या आत्महत्येस मंत्री ईश्‍वरप्पा हेच जबाबदार असल्याचे स्पष्ट होते आहे. याशिवाय बंगळूरपासून दिल्लीपर्यंत सर्वांची भेट घेऊनही कंत्राटदाराला बिल मिळाले नाही अन् 40 टक्के कमिशनची कोणीही गंभीर दखल घेतली नाही, हे दुर्दैवी म्हणावे लागेल.

Back to top button