कर्नाटक : ‘त्या’ कंत्राटदाराची आत्महत्या | पुढारी

कर्नाटक : ‘त्या’ कंत्राटदाराची आत्महत्या

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
हिंडलग्यातील रस्ताकामाचे 4 कोटींचे बिल मंजूर करण्यासाठी ज्याचे ग्रामविकास व पंचायतराजमंत्री के. एस. ईश्‍वराप्पा 40 टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप पंधरा दिवसांपूर्वी करणारा कंत्राटदार संतोष पाटील यांनी उडपीत गळफासाने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. बिल मंजूर करावे, अन्यथा आत्महत्या करू, असा इशारा पाटील यांनी तेव्हाच दिला होता. त्यामुळे काँग्रेसने ईश्‍वरप्पांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे.

संतोष पाटील (वय 35, रा. समर्थनगर, हिंडलगा, बेळगाव) यांनी आत्महत्येपूर्वी सोमवारी रात्री 11.37 वाजता माध्यम प्रतिनिधींना व्हॉटस् अ‍ॅप संदेश पाठवला आहे. यामध्ये आपल्या मृत्यूला ईश्‍वराप्पा हेच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ
उडाली असून विरोधकांसह सर्वच राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री ईश्‍वराप्पा यांना अटक करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

आत्महत्येपूर्वी माध्यमांना संदेश

आत्महत्येपूर्वी संतोषने बेळगावच्या एका चॅनेलच्या प्रतिनिधीला व्हॉटस्अ‍ॅप संदेश पाठवला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या मृत्यूला मंत्री के. एस. ईश्वराप्पा हेच जबाबदार आहेत. त्यांना शिक्षा व्हायला हवी. माझ्या सर्व आशा-आकांक्षांवर त्यांनी पाणी फेरले आहे. त्यामुळेच मी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. माझी पत्नी व मुलाला सरकार म्हणजे पंतप्रधानांनी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व व आमचे लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा तसेच इतर सर्व नेत्यांनी मदत करावी, असे हात जोडून विनंती करतो. माध्यम प्रतिनिधींना कोटी कोटी धन्यवाद. माझ्यासोबत आलेले माझे मित्र संतोष व प्रशांत हे प्रवासाला जाऊया म्हटल्यानंतर सोबत बेळगाववरून उडपीला आलेले आहेत. त्यांचा माझ्या मृत्यूशी कोणताही संबंध नाही.’ संतोषने सोशल मीडियावर पाठवलेला संदेश काही मिनिटांतच बेळगावात व्हायरल झाला. बेळगाव पोलिसांना संदेश मिळाल्यानंतर त्यांनी उडपी पोलिसांना माहिती दिली. उडपी पोलिसांनी मोबाईल सिम लोकेशन तपासले असता, मोबाईल संदेश शांभवी लॉजमधून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. लॉजमध्ये तपासीणी केली असता संतोषने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

काँग्रेस, आप आक्रमक

संतोषच्या आत्महत्येचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी ईश्वरप्पा यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची मागणी केली. काँग्रेसचे सरकार असताना तत्कालिन गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आत्महत्येआधी संतोषने मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर थेट आरोप केले आहेत. याआधारे पोलिसांनी त्यांना अटक करावी. भादंवि कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात यावो, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

हिंडलग्यातील रस्ता बिल थकीत

गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये हिंडलगा लक्ष्मी यात्रा झाली. यात्रेपूर्वी गावातील सुमारे चार कोटी रुपयांची रस्त्याची कामे संतोष पाटील यांनी पूर्ण केली होती. त्याचे बिल मिळावे म्हणून ते सातत्याने संबंधित खात्याकडे येरझार्‍या मारत होते; मात्र बिल देण्यास टाळाटाळ केली जात होती. यामुळे वैतागलेल्या संतोष पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. यामध्ये आपण रस्ताकामाचे कंत्राट घेऊन काम पूर्ण केले आहे. त्याचे बिल 4 कोटी रुपये झाले असून, हे बिल मंजूर करण्यासाठी मंत्री ईश्‍वराप्पा 40 टक्के कमिशन मागत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.

Back to top button