India wheat supplier : भारतीय शेतकरी जगाची भूक भागवणार! आता इजिप्तला करणार गहू पुरवठा | पुढारी

India wheat supplier : भारतीय शेतकरी जगाची भूक भागवणार! आता इजिप्तला करणार गहू पुरवठा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

इजिप्तनं भारताला गहू पुरवठादार (India wheat supplier) म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करत दिली आहे. जगात स्थिर अन्न पुरवठ्यासाठी विश्वसनीय पर्यायी स्त्रोत म्हणून मोदी सरकारने पाऊल उचलले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

”आमच्या शेतकर्‍यांनी धान्याचे भरघोस उत्पादन घेतल्याची खात्री दिली आहे. यामुळे आम्ही जगाला धान्य पुरवठा करण्यासाठी तयार आहोत.” असे गोयल यांनी नमूद केले आहे. दरम्यान, इजिप्शियन कृषी विभागाचे प्रमुख डॉ. अहमद अल-अतार यांच्याकडून मिळालेल्या अहवालानुसार, इजिप्तच्या कृषी मंत्र्यांनी भारतातून गहू आयातीची घोषणा केली आहे., अशी माहितीही गोयल यांनी दिली आहे.

रशिया- युक्रेन युद्धामुळे या देशांतून युरोप आणि आफ्रिकेत होणारी गहू (wheat) आणि अन्यधान्य निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे पर्याय म्हणून भारतातील गहू खरेदीसाठी मागणी वाढली आहे. अलीकडील काही दिवसांत भारतातून सुमारे ५ लाख टन गहू निर्यातीसाठी व्यापाऱ्यांनी करार केले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गहू, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे जगात धान्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताकडे आता गहू खरेदीदार आकर्षित झाले आहेत.

रशिया- युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारी धान्य पुरवठ्याची वाहतूक थांबली आहे. रशिया आणि युक्रेनमधून जगातील एकूण निर्यातीपैकी ३० टक्के गहू निर्यात होतो. पण युद्धामुळे या देशांतून होणारी गव्हाची निर्यात थांबली आहे. दरम्यान, भारतात सलग वर्षे गव्हाचे बंपर उत्पादन झाले आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा शिल्लक आहे. यामुळे व्यापारी आता निर्यातीच्या संधीचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत.

भारत यावर्षी विक्रमी ७० लाख टन गहू निर्यात (India wheat supplier) करण्याच्या तयारीत आहे. “युक्रेन आणि रशियाकडून पुरवठा खंडित झाल्यामुळे खरेदीदार भारताकडे वळले आहेत. केवळ भारतच गव्हाचा मोठा, स्थिर पुरवठादार करु शकतो आणि म्हणूनच ते भारताकडे वळले आहेत,” असे एका डीलरने म्हटले आहे.

युक्रेनमधील काळ्या समुद्राचा प्रदेश (Black Sea region) हा सुपीक आहे. हा भाग जगाचा ब्रेडबास्केट (Breadbasket of the World) म्हणून ओळखला जातो. कारण रशिया आणि युक्रेन हे गहू (wheat) आणि बार्लीचे (barley) मोठे निर्यातदार देश आहेत. जगातील गहू आणि बार्लीच्या निर्यातीपैकी जवळजवळ एक तृतीयांश निर्यात या दोन देशांतून होते. युक्रेन मक्याचादेखील एक प्रमुख पुरवठादार देश आहे आणि सूर्यफूल तेल निर्यातीत तो जगात आघाडीवर आहे. पण रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील शेतकऱ्यांनी (Ukrainian farmers) देश सोडून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. बंदरे ओस पडल्याने येथून जगभरात गहू आणि इतर खाद्यपदार्थांची होणारी निर्यात थांबली आहे. त्याचबरोबर कृषीसंपन्न असलेल्या रशियावर पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे जगभरात धान्य निर्यात कमी होऊ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

युक्रेनमधून गहू आणि मका पुरवठा थांबल्याने अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. इजिप्त आणि लेबनॉन सारख्या देशांत गरिबी आणखी वाढण्याची भिती आहे. या देशांतील लोक सरकारकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून आहेत. दरम्यान, युक्रेनवरील आक्रमणामुळे युरोपीय देशांतील अधिकारी अन्नधान्याचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन उपाययोजना आखत आहेत. कमी पुरवठ्यामुळे पशुखाद्याच्या किंमतीही वाढणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

भारत आर्थिक अडचणीत असलेल्या श्रीलंकेच्याही मदतीला धावला आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे जीवनाश्यक वस्तू, इंधन महागल्याने लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातून श्रीलंकेत ४० हजार टन तांदूळ पाठविला जात आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. श्रीलंकेतील इंधन, अन्न आणि औषधांसह अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा दूर करण्यासाठी भारत १ अब्ज डॉलर कर्ज देणार आहे. भारतातून होणाऱ्या तांदूळ पुरवठ्यामुळे श्रीलंकेतील तांदळाच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. भारतातून पाठवण्यात आलेला तांदूळ श्रीलंकेत एप्रिलच्या मध्यावधीला उपलब्ध होईल, असा अंदाज भारतीय व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भारतीय व्यापारी येत्या आठवड्यात साखर, गहू आणि अन्य जीवनावश्यक वस्तू पाठवण्यास सुरुवात करतील, असे एका डीलरकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button