दिल्लीत साेमवारपासून रिक्षा, टॅक्सी, कॅबचालक संघटनांचा बेमुदत संप | पुढारी

दिल्लीत साेमवारपासून रिक्षा, टॅक्सी, कॅबचालक संघटनांचा बेमुदत संप

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी दरवाढविरोधात दिल्लीतील रिक्षा, टॅक्सी आणि कॅबचालक संघटनांनी १८ तारखेपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. इंधन दरवाढीमुळे चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सरकार  दिलासा देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा दिल्ली टॅक्सी टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी दिला.

या आंदाेलनाबाबत सर्वोदय चालक संघटनेचे अध्यक्ष कमलजित गिल म्‍हणाले, पुढील आठवड्यापासून सुरु होणार्‍या संपात रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेरचालक तसेच बसचालक सामील होणार आहेत. परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की, वाहनचालकांना विमा, रस्ते शूल्क तसेच गाड्यांच्या फिटनेससाठी पैसे मिळवणे मुश्किल झाले आहे. सरकार सर्व प्रकारचे अ‍ॅप बनवू शकते तर ओला उबेरप्रमाणे वेगळे अ‍ॅप तयार करावे आणि दिल्लीत टॅक्सी चालवावी, असा टोलाही गिल यांनी लगावला.

इंधन दरवाढीविरोधात मालवाहतूकदार संघटनेने देखील संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ऑल इंडिया मोटार अँड गुड्स ट्रान्सपोर्टच्या असोसिएशनच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. सरकारकडून सातत्याने इंधन दरवाढ सुरु आहे. माल चढविणे आणि उतरविणे यावरच सध्या चार हजार रुपयांपर्यंतचे डिझेल खर्च होत आहे. हे परवडणारे नाही, असे राजेंद्र कपूर म्‍हणाले.

हेही वाचलं का  

Back to top button