

पटना (रोहतास) ; पुढारी ऑनलाईन चोरीच्या बातम्या आपण नेहमीच वाचल्या किंवा ऐकल्या असतील, मात्र तुम्ही कधी वापरात असलेला पूल चोरीला गेलेला ऐकला आहे का? बिहारच्या रोहतासमध्ये अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे. ५० वर्षे जुना तब्बल १००० किलो वजनाचा लोखंडी पूल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना नासरीगंज प्रखंडच्या आदर्श ग्राम अमियावर येथील आहे. अर्धा डझन गावांना जोडण्यासाठी आरा कॅनलवर हा पूल बनवण्यात आला होता.
रोहतासमधील हा 100 फूट लांबीचा ऐतिहासिक पूल सुमारे 50 वर्षे जुना होता. मिळालेल्या माहितीनुसार, विभागीय कर्मचारी असल्याचे भासवून काही लोकांनी हा पूल जेसीबी आणि गॅस कटरने कापला आणि नंतर त्याचा काही भाग घेऊन ते फरार झाले. यात अर्धा डझनहून अधिक लोकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मात्र, यामध्ये विभागीय संगनमत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दुसरीकडे, पुलाच्या चोरीची घटना उघडकीस येताच पाटबंधारे विभागाचे एसडीओ राधेश्याम सिंह यांच्या सूचनेवरून विभागीय जेई अर्शद कमल शमशी यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुल चोरीच्या घटनेप्रकरणी त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. जेई म्हणाले की, एफआयआर नोंदवल्यानंतर विभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना कळविण्यात आले आहे.
पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले…
या प्रकरणी ठाणे प्रमुख सुभाष कुमार यांनी एफआयआरला दुजोरा देताना सांगितले की, विभागीय जेईकडून आलेल्या अर्जाच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याचवेळी अशा प्रकारे लोखंडी पुलाची चोरी होऊन त्याची माहिती विभाग व प्रशासनाला न मिळणे धक्कादायक आहे. हा पूल लोअर डिव्हिजन नसरीगंजच्या सोन कालव्याच्या अमियावर गावात असलेल्या आरा मुख्य कालव्यावर असलेल्या काँक्रीट पुलाच्या समांतर सुमारे पंचवीस फूट अंतरावर होता.