नाशिक (मनमाड) : प्रतिनिधी
कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्यास रेल्वे मंत्र्यालयाने ग्रीन सिग्नल दिला असून सोमवार 11 एप्रिल पासून ही गाडी रोज धावणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून डॉ. भारती पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी सुरू केली जाणार आहे.
गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी गोदावरी राजा चॅरिटेबल या प्रवासी संघटनेने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका देखील दाखल केलेली आहे. गोदावरी एक्स्प्रेस सुरू होत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसोबत रोज अप-डाऊन करणारे चाकर मान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मनमाड रेल्वे स्थानकावरून सुटणारी पंचवटी एक्स्प्रेस प्रमाणे गोदावरी एक्स्प्रेस मनमाड, येवला, नांदगाव, लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली या भागातील सर्वसामान्य प्रवाशांसोबत रोज अप-डाऊन करणा-या चाकरमान्यांची लाईफ लाईन मानली जाते. मात्र कोरोनामुळे सर्व गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जवळपास सर्वच गाड्या धावू लागल्या मात्र गोदावरी एक्स्प्रेसला रेल्वे मंत्रालयाने रेड सिग्नल दिलेला होता. त्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गाडी सुरू करण्यासाठी प्रवासी संघटनांनी वेळोवेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली मात्र तरी देखील गाडी सुरू झाली नव्हती. अखेर गोदावरी राजा या प्रवासी संघटनेने मुंबई हायकोर्टात धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली. त्याची सुनावणी झाली नाही.
तिकडे प्रवाशांसोबत चाकर मान्यांची होत असलेली गैरसोय पाहून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना केवळ निवेदनच दिले नाही तर गाडी सुरू करण्याचा आग्रह धरला., रेल्वे मंत्र्यांनी याची तातडीने दखल घेऊन गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत ग्रीन सिग्नल दिला. डॉ. भारती पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सोमवार 11 एप्रिल पासून गाडी रोज धावणार आहे. सोमवारी 11 वाजता डॉ.. भारती पवार हिरवा झेंडा दाखवून याच गाडीने नाशिकला जाणार आहे. मंगळवार पासून मात्र गाडी नेहमीच्या वेळेवर धावणार आहे. गोदावरी एक्स्प्रेस सुरू होत असल्याचे ऐकून सर्वसामान्य प्रवाशांसोबत अप-डाऊन करणा-या चाकर मान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.