मुंबई; पुढारी ऑनलाईन : अखेर विलीनीकरणाची मागणी मान्य न होताच गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपाला मुंबई उच्च न्यायालयानेच गुरुवारी अल्टिमेटम दिला.
या कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याची शेवटची मुदत न्यायालयाने दिली असून, त्यानंतरही कामावर न येणार्या कर्मचार्यांना काढून टाकण्याचे अधिकार एसटी महामंडळ आणि राज्य सरकारला असतील.
असे असूनही आज अनपेक्षितपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवारांच्या दिशेने मोर्चा वळवला. एसटी कर्मचाऱ्यांनी थेट पवारांच्या घराच्या दिशेने चाल करत चप्पल आणि दगड फिरकावत चाल केली. अनपेक्षित झालेल्या या घटनेची पोलीसांना सुद्धा माहिती नव्हती. त्यामुळे सुरुवातीला एकच गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांसमोर खासदार सुप्रिया सुळे यांनी धीरोदत्तपणे जात कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
मी चर्चेसाठी तयार आहे, चप्पल, दगडफेक करून प्रश्न सुटणार नाही असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. त्यांनी जमावाला शांत करताना माझे आई वडिल आणि मुलगी याच ठिकाणी असून त्यांना पाहून येते आणि आपल्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोर ठिय्या मारला आहे. घटनेचे गांभीर्य समजताच सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी पोहोचले आहेत. आंदोलकांनी उचलण्यासाठी स्कूल बसही मागवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
हे ही वाचलं का ?