Faisal Patel : काँग्रेसचे ‘संकटमोचक’ अहमद पटेल यांच्‍या पुत्राचे ट्विट, “वाट पाहून मी…” | पुढारी

Faisal Patel : काँग्रेसचे 'संकटमोचक' अहमद पटेल यांच्‍या पुत्राचे ट्विट, "वाट पाहून मी..."

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन
काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे नाव आजही चर्चेत आलं तर काँग्रेसचे संकटमोचक, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्‍लागार अशी आठवण समोर येते. अहमद पटेल यांनी अनेक आव्‍हानात्‍मक प्रसंगी पक्षश्रेष्‍ठींना योग्‍य सल्‍ला देत पक्षाची वाटचाल अधिक सुकर केली. मात्र आता त्‍यांचे पुत्र फैसल पटेल ( Faisal Patel) यांनी ट्विट करत काँग्रेससमोरील संकट वाढवले आहे.

फैसल पटेल यांनी आपल्‍या ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, ” वाट पाहून मी थकलो आहे. हायकंमाड यांच्‍याकडून प्रोत्‍साहन मिळत नाही. आता मी माझ्‍यासमोरील सर्व पर्याय खुले ठेवले आहेत”. फैसल यांच्‍या या ट्‍विटमुळे काँग्रेसमधील ज्‍येष्‍ठ नेत्‍यांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी फैसल हे काँग्रेसला सोडतील, अशीही चर्चा राजकीय वुर्तळात रंगली आहे.

फैसल पटेल यांचे पिता अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्‍लागार होते. नोव्‍हेंबर २०२० मध्‍ये कोरोनाची लागण झाल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर फैसल पटेल हे काँग्रेसकडून जबाबदारी सोपवण्‍यात येईल, याच्‍या प्रतीक्षेत होते. मात्र काँग्रेसकडून त्‍यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्‍याचे त्‍यांच्‍या ट्‍विटवरुन स्‍पष्‍ट होते आहे. त्‍यांना असणार्‍या राजकीय पार्श्वभूमीमुळे ते राजकारणात प्रवेश करतील. मात्र ते काँग्रेसऐवजी अन्‍य राजकीय पक्षात प्रवेश करतील, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

Faisal Patel : विधानसभा निवडणूक लढविण्‍याचे दिले होते संकेत

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठी जबाबदारी देईल, अशी अपेक्षा फैसल यांना होती. भरुच विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्‍याचे संकेतही त्‍यांनी दिले होते. तसेच अहमद पटेल यांनी सुरु केलेले सामाजिक कार्य पुढे नेण्‍याचा मानसही त्‍यांनी व्‍यक्‍त केला होता.

फैसल यांनी केजरीवाल यांची घेतली होती भेट

काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींनी मला निवडूक लढविण्‍याचेआदेश दिले तर मी भरुच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, असे फैसल यांनी सांगितले होते. यानंतर त्‍यांनी आम आदमी पार्टीचे निमंत्रक व दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. आता त्‍यांनी नाराजीचे ट्‍विट केल्‍याने ते आम आदमी पार्टीत प्रवेश करतील, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button